विज जोडणीच्या तक्रारीची दखल जनता दरबारातही नाही
By admin | Published: May 30, 2017 07:51 PM2017-05-30T19:51:35+5:302017-05-30T19:51:35+5:30
वाशिम: वाशिम येथे आयोजित उर्जामंत्र्यांच्या जनता दरबारात रखडलेल्या विज जोडणीची तक्रार कारंजा तालुक्यातील सिरसोलीच्या शेतकऱ्याने केली; परंतु आता १२ दिवस उलटले तरी दखल घेण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: वाशिम येथे आयोजित उर्जामंत्र्यांच्या जनता दरबारात रखडलेल्या विज जोडणीची तक्रार कारंजा तालुक्यातील सिरसोलीच्या शेतकऱ्याने केली; परंतु आता १२ दिवस उलटले तरी, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता कोणाकडे जावे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडे उपस्थित केला जात आहे.
सिरसोली येथील शेतकरी प्रतिक तोंडे यांनी त्यांच्या शेतात कृषीपंपासाठी विज जोडणी मिळावी, म्हणून २९ एप्रिल २०१४ रोजी अर्थात तीन वर्षांपूर्वी विज वितरणकडे संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज सादर केला, तसेच नियमानुसार अनामत रकमेचा भरणाही केला; परंतु तीन वर्षांपासून त्यांना विज जोडणी मिळालीच नाही. अशात १८ मे रोजी वाशिम येथे राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये प्रतिक तोंडे यांनी उर्जामंत्र्यांकडे निवेदन सादर केले; परंतु त्यानंतरही १२ दिवस उलटले तरी, त्यांना विज जोडणी मिळाली नाही. विज जोडणीचे काम करणारा कंत्राटदार शेतकऱ्याला अकारण येरझारा करण्यास विवश करीत आहे, असे असतानाही विज वितरण दखल घेत नसल्याने प्रतिक तोंडे यांनी पुन्हा राज्याचे उर्जामंत्री आणि विज वितरणच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.