मानोरा सार्वजनिक बांधकाम उपविभाग नावापुरताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 02:24 PM2018-11-09T14:24:45+5:302018-11-09T14:24:51+5:30
मानोरा (वाशिम) : सार्वजनिक बांधकाम निर्माण उपविभाग, वाशिम या कार्यालयाचे मानोरा येथे स्थानांतरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : सार्वजनिक बांधकाम निर्माण उपविभाग, वाशिम या कार्यालयाचे मानोरा येथे स्थानांतरण करण्यात आले आणि या उपविभागाचे नाव आता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मानोरा असे करून हे कार्यालय १२ आॅगस्ट २०१८ पासून मानोरा येथे सुरु करण्यात आले; परंतु अद्यापही मानोरा येथून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज चालत नसून, या अंतर्गत येणारी कामे मंगरुळपीर येथूनच करण्यात येत आहेत.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयासाठी मानोरा येथे इमारत नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांसाठी असलेल्या निवासस्थानाच्या इमारतीत कार्यरत करण्यात आले. तर नव्याने शासनाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट रस्ते व इमारतीची कामे, पोहरादेवी विकास आराखड्याची कामे, नगरपंचायत मानोरा प्रशासकीय इमारतीचे काम आदी कामांची अंदाजपत्रके बनविणे, ई-निविदा प्रपत्रे तयार करणे ही कामे तातडीच्या स्वरुपाची असल्याने या कार्यालयाचे कामकाज विश्रामगृह मानोरा येथून व संगणकावर करावयाची अंदाजपत्रके/निविदा प्रपत्रे ही कामे वाशिम येथील पूर्वीच्या कार्यालयातून करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले, तसेच इमारतीची दुरुस्ती व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर कार्यालय पूर्ण स्वरुपात कार्यान्वित होईल व सदर कार्यालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात या कार्यालयाकडून करावी लागणारी कामे मंगरुळपीर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे वर्ग करण्यात आली असून, मानोरा सार्वजनिक बांधकाम उपविभागाची निर्मिती केवळ नावापुरतीच झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.