सायंकाळी ४ वाजेपर्यंतच करता येणार जाहीर प्रचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:32+5:302021-07-01T04:27:32+5:30

संतोष वानखडे वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै रोजी मतदान होत असून, जिल्ह्यात निर्बंध लागू झाले ...

Publicity can be done only till 4 pm! | सायंकाळी ४ वाजेपर्यंतच करता येणार जाहीर प्रचार !

सायंकाळी ४ वाजेपर्यंतच करता येणार जाहीर प्रचार !

Next

संतोष वानखडे

वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै रोजी मतदान होत असून, जिल्ह्यात निर्बंध लागू झाले आहेत. या निर्बंधानुसार उमेदवारांना सायंकाळी ४ वाजेपर्यंतच जाहीररित्याप्रचार करता येणार आहे. सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी लागू असल्याने उमेदवाराला घरोघरी जाऊन प्रचार करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रचारावर मर्यादा आल्याने इच्छुक उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

‘डेल्टा प्लस व्हेरियंट’चा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य शासनाने जिल्ह्याचा समावेश ‘अनलॉक’च्या तिसऱ्या स्तरात केल्याने २८ जूनपासून जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत. जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू आहे. निर्बंधाच्या या कालावधीत पोटनिवडणूक होत असल्याने प्रचारावर मर्यादा आल्या आहेत. जाहीर प्रचारसभा, भव्य रॅली काढता येणार नसून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोजक्याच समर्थकांच्या उपस्थितीत प्रचार करता येणार आहे तसेच गर्दी होतील, असे कार्यक्रमही घेता येणार नाही. सायंकाळी ४ वाजेनंतर उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचार करावा लागणार आहे. दरम्यान, प्रचारावर मर्यादा आल्याने उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कमी कालावधीत आणि तेही मोजक्याच समर्थकांच्या उपस्थितीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान उमेदवारांना पेलावे लागणार आहे.

०००००००००००००००००००

बॉक्स

घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार

निर्बंधाच्या कालावधीत पोटनिवडणूक होत असल्याने जाहीर प्रचारावरही मर्यादा आल्या आहेत. समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढता येणार नसून घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. यामुळे उमेदवारांची सर्वाधिक धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

०००००००००००

बॉक्स

उमेदवारांमध्ये नाराजी

जाहीर प्रचार, समर्थकांच्या उपस्थितीत रॅली, खुल्या मैदानात जाहीर प्रचार सभा आदींवर मर्यादा आल्याने उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. सायंकाळी ५ वाजेनंतरच्या संचारबंदीतून निवडणूकक्षेत्रापुरती सूट देण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.

००००

बॉक्स

दुसऱ्या दिवशीही उमेदवारी अर्ज नाही

२९ जूनपासून जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशीही ३० जून रोजी एकही उमेदवारी अर्ज आला नाही. २९ जून ते ५ जुलै या दरम्यान उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहेत.

००००००००००००००

बॉक्स

नियमाचा भंग झाल्यास गुन्हा दाखल होण्याची भीती

आचारसंहिता तसेच कोरोनाविषयक नियम डावलून जाहीर प्रचार सभा, समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढली आणि याबाबत कुणी तक्रार केली तर गुन्हा दाखल होण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे रॅली, जाहीर प्रचार सभांना आवर घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.

०००००

कोट बॉक्स

राज्य शासनाने वाशिम जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरात केल्याने, २८ जूनपासून जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील नियमावली लागू झाली आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू आहे. जाहीर प्रचार सभा, रॅली काढता येणार नाही. घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. कुठेही ५० पेक्षा अधिक नागरिकांची गर्दी होईल, असा कार्यक्रम घेता येणार नाही. नवीन नियमावली व आचारसंहितेचे पालन करून प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करावे.

- शैलेश हिंगे,

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.

००००००००००००००

Web Title: Publicity can be done only till 4 pm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.