शासकीय सुटीच्या दिवशीही सुरू राहणार तूर खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:07 PM2017-08-05T14:07:09+5:302017-08-05T14:07:09+5:30
वाशिम : जिल्ह्यातील पाच तूर खरेदी केंद्रांवर दैनंदिन किमान १३ हजार क्विंटल तूर मोजल्या जावी, असे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहेत. मात्र, २६ जुलैपासून सुरू असलेल्या तूर खरेदीचा वेग अगदीच मंद असून दैनंदिन तीन हजार क्विंटलही तूर मोजल्या जात नसल्याने ३१ आॅगस्टपर्यंत अडीच लाख क्विंटल तूर मोजणे कसे शक्य होईल, असा प्रश्न उपस्थित करून जिल्हाधिकाºयांनी तूर खरेदीच्या मंदावलेल्या गतीबाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शासकीय सुटीच्या दिवशीही खरेदी केंद्र सुरू ठेवून कुठल्याही परिस्थितीत विहित मुदतीत टोकनधारक शेतकºयांची तूर खरेदी करून घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ३१ मे २०१७ अखेर हजारो शेतकºयांना टोकन देण्यात आले. त्यानुसार, २ लाख ८४ हजार ५३७ क्विंटल तूर मोजून खरेदी करणे क्रमप्राप्त आहे. मध्यंतरी बंद पडलेली तूर खरेदीची प्रक्रिया बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २६ जुलैपासून पुन्हा सुरू करण्यात आली. ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत ती पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. असे असले तरी गेल्या ९ दिवसांमध्ये (४ आॅगस्टपर्यंत) केवळ ३५ हजार क्विंटलच्या आसपासच तूर खरेदी करण्यात आली असून हीच गती कायम राहिल्यास आगामी २२ दिवसांत उर्वरित २ लाख ४९ हजार क्विंटलपेक्षा अधिक तूर कशी मोजली जाणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात ४ आॅगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधकांनी वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर आणि कारंजा येथील सहकारी संस्थेचे सहायक निबंधक, सर्व बाजार समित्या, खविसं, विदर्भ कृषी पणन व प्रक्रिया सहकारी संस्था, जिल्हा मार्केटिंग अधिकारी आदिंना पत्र पाठवून जिल्हाधिकाºयांनी तूर खरेदीच्या मंदावलेल्या गतीबाबत नाराजी व्यक्त केल्याचे कळविले आहे.
दरम्यान, विहित मुदतीत तूर खरेदीचे लक्षांक पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तूर खरेदी केंद्र शासकीय सुटीच्या दिवशीही सुरू ठेवावे. या सुचनेचे पालन न झाल्यास यंत्रणेतील प्रत्येकाला वैयक्तिकरित्या जबाबदार धरून कामकाजाबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला जाईल, असेही जिल्हा उपनिबंधकांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.