अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या पीक नुकसानाचे होणार पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 06:14 PM2020-08-28T18:14:49+5:302020-08-28T18:14:55+5:30
विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक मदतीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सुचना कृषी उपसचिवांनी २५ आॅगस्टच्या पत्रान्वये सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच शेतकºयांना निसर्गाच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. त्यात जूनच्या मध्यंतरी पावसाचा खंड सोडला, तर जुन अखेरपासून मागील दोन महिन्यात वारंवार अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात उडिद, मुग ही पिके सततच्या पावसामुळे खराब होऊन काढणी योग्यही राहिली नाहीत, तर अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकºयांच्या जमिनीसुद्धा खरडून गेल्या. त्यानंतर जुलैच्या अखेरपासून पावसाने संततधार लावल्याने नदी, नाल्यांना पूर गेले, त्यामुळे शेतात पाणी साचून सोयाबीन पीक पिवळे पडून सुकले आहे. इतरही खरीप पिकांची स्थिती अत्यंत वाईट झाल्याने शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता राहिली नाही. शेतकºयांच्या या नुकसानाचा विचार करून शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कृषी उपसचिवांनी सर्व विभागी आयुक्तांना २५ आॅगस्ट रोजी पत्र पाठवून पीक नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सुचना देण्याचे निर्देश दिले, तर विभागीय आयुक्तांनी २६ आॅगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकाºयांना या संदर्भात पत्र देऊन शासन निर्णयात विहित केलेल्या दराने बाधित शेतकºयांना मदत करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
जूनमधील नुकसानाची पाहणी कशी करणार
कृषी उपसचिवांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार जून-आॅगस्ट २०२० मध्ये अतिवृष्टी आणि पुराने झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करण्याचे आदेश आहेत. त्यात जुलै अखेर आणि आॅगस्टमधील नुकसानाचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करणे शक्य असले तरी, जून महिन्यात अर्थात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या नुकसानाचे पंचनामे कोणत्या पद्धतीने करणार, शेतकºयांचे नुकसान निश्चित करण्यासाठी कोणते निकष लावणार, असा प्रश्न उपस्थीत होत आहे. त्यात काही ठिकाणी महसूल विभागाने पूर्वीच पाहणी केली असली तरी, बहुतांश भागांत जूनमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणीच झाली नाही. अशा शेतकºयांना आता मदत कशी देणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.