नियम तोडणाऱ्यांवर धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:51+5:302021-05-20T04:44:51+5:30
वाशिम : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. ...
वाशिम : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. त्यानंतर मात्र विनाकारण घराबाहेर पडून नियम तोडणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात असल्याचे दिसून येत आहे.
................
घरीच उपचार घेण्यावर अनेकांचा भर
वाशिम : कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतरही अनेकजण घरीच उपचार घेण्यावर भर देत आहेत. अशा लोकांनी स्वत:सोबतच इतरांचीही काळजी घ्यावी. विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
.................
डासांचा प्रादुर्भाव; ग्रा.पं.चे दुर्लक्ष
जऊळका रेल्वे : गावात विविध भागात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमध्ये जोर धरत आहे.
..................
मास्क, सॅनिटायझर विक्रीत पुन्हा वाढ
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गंभीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर आैषध विक्रीच्या दुकानांमधून मास्क व सॅनिटायझरची विक्रीदेखिल मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
..............
...अन्यथा पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होणार
वाशिम : शहर परिसरातील कुपनलिकांची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. काहीठिकाणच्या कुपनलिका पूर्णत: कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर हा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत आहेत.
....................
बंदोबस्तावरील पोलिसांचा खडा पहारा
उंबर्डा बाजार : वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लागलेला असून कर्मचारी खडा पहारा देत आहेत.
....................
‘समृद्ध गाव’ची कामे सुरू करण्याची मागणी
वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी असलेल्या गावांत कामे थांबविण्यात आली आहेत. ती आता पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
....................
जामदरा तलावाच्या दुरुस्तीची मागणी
मानोरा : जामदरा तलावाच्या भिंतीत ‘लिकेज’ असल्याने दरवर्षी हा तलाव कोरडा पडतो. यंदाही या समस्येमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
....................
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मेडशी : परिसरात कोरोना संसर्ग वाढत असताना मेडशीत काहीठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात आहे. नागरिकांनी ही बाब गंभीरपणे घेत नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले.
....................
शिरपूरात ग्रामस्थांची कोरोना चाचणी
शिरपूर जैन : गेल्या काही दिवसात अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने गावातील ज्येष्ठ व दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींसोबतच इतर ग्रामस्थांची कोरोना चाचणी सुरू केली आहे.
....................
‘कन्टेनमेंट झोन’ची अंमलबजावणी
रिसोड : तालुक्यातील काही गावांमध्ये दरदिवशी कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना दक्षतेच्या सूचना दिल्या असून, बाधितांचा परिसर ‘कन्टेनमेंट झोन’ म्हणून जाहीर केला जात आहे.
..............
उकळीपेन येथे ‘एटीएम’चा अभाव
अनसिंग : वाशिम तालुक्यातील तुलनेने अधिक लोकसंख्या असलेल्या तथा हिंगोली-वाशिम या महामार्गावर वसलेल्या उकळीपेन या गावात ‘एटीएम’ची गरज भासत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
................
उघड्यावर शौचवारी; कारवाईची मागणी
शेलुबाजार : ग्रामीण भागात शौचालय उभारण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिक गावातील रस्त्याच्या दुतर्फा शौचास बसत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने उघडयावर शाैचास जाणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
..............
कार्ली परिसरात वीज पुरवठ्यात व्यत्यय
वाशिम : परिसरात सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे बागायतदार शेतकरी त्रस्त झाले आहेत. स्प्रींकलरचा वापर करून पिकांना पाणी दिले जात आहे. मात्र, विजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे अडचण उद्भवली आहे.