अनसिंग येथे ३२ हजार क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:47+5:302021-01-13T05:44:47+5:30
वाशिम : सीसीआयकडून गत हंगमातील कपाशीच्या खरेदीसाठी अनसिंग येथे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर १० जानेवारीपर्यंत ३२ ...
वाशिम : सीसीआयकडून गत हंगमातील कपाशीच्या खरेदीसाठी अनसिंग येथे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर १० जानेवारीपर्यंत ३२ हजार क्विंटल कपाशीची खरेदी करण्यात आल्याची माहिती केंद्र प्रभारी उमेश तायडे यांनी दिली.
जिल्ह्यात गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीच्या उत्पादनात प्रचंड घट आली. त्यातच व्यापाऱ्यांकडून कवडीमोल दराने शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी केली जात होती. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. अखेर सीसीआयकडून अनसिंग येथील जिनिंग, प्रेसिंगमध्ये २३ नोव्हेंबरपासून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यात १० जानेवारीपर्यंत वाशिम तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडील ३२ हजार क्विंटलपेक्षा अधिक कपाशीची खरेदी सीसीआयकडून करण्यात आली आहे. हजारो शेतकऱ्यांनी या केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी केली असून, अद्यापही अनेक शेतकऱ्यांचा कापूस मोजून घेणे बाकीच आहे. दरम्यान, शासकीय खरेदी केंद्रावर कापूस मोजणीनंतर शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यास आता आठवडाभरापेक्षा अधिक विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.