औषध खरेदी ‘लालफीतशाहीत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 01:08 AM2017-08-24T01:08:37+5:302017-08-24T01:08:47+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सन २0१७ - १८ या वर्षातील जनावरांच्या उपचारार्थ लागणार्या औषध खरेदीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करून तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी संबंधित कंपनीकडे औषध साठा पुरविण्याची मागणी नोंदविली. अद्याप औषध साठा प्राप्त झाला नसल्याने पशुपालकांना भुर्दंड बसत आहे.
संतोष वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सन २0१७ - १८ या वर्षातील जनावरांच्या उपचारार्थ लागणार्या औषध खरेदीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करून तीन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी संबंधित कंपनीकडे औषध साठा पुरविण्याची मागणी नोंदविली. अद्याप औषध साठा प्राप्त झाला नसल्याने पशुपालकांना भुर्दंड बसत आहे.
जिल्ह्यात श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ असे एकूण ५८ पशुवैद्यकीय दवाखाने व पशुउपचार केंद्र आहेत. या दवाखान्यांमधून सात लाख पशुधनाचे ‘आरोग्य’ सांभाळण्यासाठी दरवर्षी विविध प्रकारचे औषध पुरविले जाते. पावसाळ्याच्या दिवसात पशुंना विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात. पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन साधारणत: जून महिन्यातच पशुवैद्यकीय दवाखान्यांत आवश्यक त्या औषधाचा साठा उपलब्ध असणे अपेक्षित आहे. सुरुवातीला तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर.ए. कल्याणपुरे यांच्या स्वाक्षरीने औषध खरेदीसाठीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आला; मात्र त्यानंतर काही दिवसातच एका प्रकरणात डॉ. कल्याणपुरे यांच्या निलंबनाचे शासनाचे आदेश धडकले. त्यामुळे डॉ. महाळंकर यांच्याकडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला. प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसाठी पाठविलेल्या प्रस्तावात त्रुटी आल्याने, त्रुटींची पूर्तता करण्यात आली. येथे स्वाक्षरीचा मुद्दा उपस्थित झाल्याने जुलै महिन्यात परत नव्याने प्रस्ताव सादर करावा लागला. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी आवाज उठविला होता. कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनीदेखील प्रशासकीय दिरंगाईबाबत अधिकार्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे, या प्रस्तावास तांत्रिक मान्यता मिळविणे आदी सोपस्कार पूर्ण होण्यात एका महिन्याचा कालावधी गेला. प्रशासकीय दिरंगाईचा ठपका ठेवत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पदाचा प्रभार काढून सदर प्रभार ऑगस्ट महिन्यात डॉ. जे.पी. केंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आले. या सर्व घडामोडीत पशुसंवर्धन दवाखान्यांत औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने पशुपालकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. अमरावती विभागीय स्तरावर पाठविलेल्या औषध खरेदीच्या या प्रस्तावाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिक मान्यता मिळाली. त्यामुळे ११ ऑगस्ट रोजी सलाईन, दैनंदिन औषध, अँटिबायोटिक, फर्या आजार, तोंडखुरी व पायखुरी यांसह अन्य आजारांवरील औषधांचा पुरवठा करण्यासाठी संबंधित कंपनीकडे मागणी नोंदविण्यात आली.
अद्याप औषध साठा प्राप्त झाला नसल्याने पशुपालकांना तूर्तास तरी खासगी मेडिकलवरूनच औषध विकत घ्यावे लागत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांत औषधांचा तुटवडा असल्याने पशुपालकांना भुर्दंंड बसत आहे.
पिंप्री येथे फर्यासदृश आजार; औषधसाठा उपलब्ध नाही
मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथे जनावरांना फर्यासदृश आजाराची लागण झाली आहे. आतापर्यंत ११ गुरे दगावली असून, आणखी सात-आठ जनावरांना या आजाराची लागण झालेली आहे. या आजारावर आवश्यक असलेले औषध पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध नसल्याने पशुपालकांना खासगी मेडिकलवरुन विकत आणावे लागत आहे.
१५ दिवसांपूर्वी मी पशुसंवर्धन विभागाचा प्रभार स्वीकारला आहे. औषध खरेदीच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाल्याने ११ ऑगस्ट रोजी संबंधित औषधांची मागणी त्या-त्या कंपनीकडे नोंदविण्यात आली. औषध साठा लवकरात लवकर प्राप्त व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. जे.पी. केंद्रे
प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.
पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांत औषध साठा उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. औषध साठय़ाच्या प्रस्तावास दिरंगाई करणार्यांना त्या पदावरून बाजूला सारत आता डॉ. जे.पी. केंद्रे यांच्याकडे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. पशुपालकांची औषधबाबत गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन येत्या दोन-चार दिवसातच औषध साठा प्राप्त होईल.
- विश्वनाथ सानप
सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, वाशिम.