उपबाजार बंद पाडून निच्चांकी दराने शेतमालाची खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 07:33 PM2017-10-16T19:33:55+5:302017-10-16T19:37:01+5:30
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राजू चौधरी यांच्यासह अनसिंग उपबाजार समितीचे उपसभापती रामेश्वर काटेकर, संचालक डॉ. जगदीश दहात्रे आदिंनी संतप्त शेतक-यांना सोबत घेवून बाहेर बेकायदेशीर सुरू असलेली शेतमाल खरेदी बंद पाडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तालुक्यातील अनसिंग या तुलनेने मोठ्या गावातील उपबाजार समितीअंतर्गतच्या व्यापा-यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मनमानी कारभार चालविला असून त्याचा सोमवारी खºयाअर्थाने अतिरेक झाला. नाणेटंचाईचे कारण समोर करून आधी बाजार समिती बंद पाडणा-या या व्यापा-यांनी बाहेर बसून मात्र निच्चांकी दराने शेतमालाची खरेदी केली. दरम्यान, हा प्रकार असह्य झाल्याने वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राजू चौधरी यांच्यासह अनसिंग उपबाजार समितीचे उपसभापती रामेश्वर काटेकर, संचालक डॉ. जगदीश दहात्रे आदिंनी संतप्त शेतक-यांना सोबत घेवून बाहेर बेकायदेशीर सुरू असलेली शेतमाल खरेदी बंद पाडली.
अनसिंग येथील श्री हुरकट अॅण्ड कंपनी, श्री म.मा. मोदानी, श्री ट्रेडिंग कंपनी, श्री गोविंद ट्रेडिंग कंपनी, श्री मानधने अॅण्ड कंपनी, श्री तिरूपती ट्रेडिंग कंपनी चालविणाºया व्यापा-यांनी १४ आॅक्टोबरला अनसिंग उपबाजार समितीकडे रितसर पत्रव्यवहार करून नाणेटंचाई आणि सोया प्लांटच्या खरेद्या बंद असल्याचे कारण समोर करून १६ आॅक्टोबरपासून २१ आॅक्टोबरपर्यंत उपबाजार बंद ठेवण्याबाबत कळविले. त्यानुसार, १६ आॅक्टोबरला अनसिंगचा उपबाजार बंद राहिला. असे असताना काही व्यापा-यांनी बाहेर नियमबाह्य पद्धतीने शेतमाल खरेदी केला. विशेष म्हणजे बाजार समितीत मिळणाºया दरापेक्षा अगदीच अल्प दर शेतक-यांना देण्यात आले. दरम्यान, हा गंभीर प्रकार लक्षात येताच राजू चौधरी, उपसभापती रामेश्वर काटेकर, डॉ. दहात्रे आदिंनी हस्तक्षेप करून ज्याठिकाणी शेतमालाची खरेदी सुरू होती, त्याठिकाणी धडक देवून व्यापा-यांना खडे बोल सुनावून शेतक-यांना अपेक्षित दर देण्याच्या सूचना केल्या.
पाच हजार क्विंटल सोयाबिनची नियमबाह्य खरेदी!
तकलादू कारणे समोर करून उपबाजार बंद पाडणाºया ज्या व्यापा-यांनी बाहेर सोयाबिनची नियमबाह्य खरेदी केली, त्यांच्या दुकानांचे पंचनामे करण्यात आले. त्यात सुमारे ५ हजार क्विंटल सोयाबिनची खरेदी झाल्याचे निष्पन्न झाले. विशेष गंभीर बाब म्हणजे यातील काही व्यापा-यांकडे तर शेतमाल खरेदीचा परवाना देखील नसल्याचे दिसून आले. दरम्यान, संबंधित व्यापा-यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.