पूर्णा - अकोला रेल्वे मार्गावरून थेट मुंबई गाठता यावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:52 AM2021-09-16T04:52:33+5:302021-09-16T04:52:33+5:30
वाशिम : गेल्या वर्षभरापासून अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर मुंबईकडे जाणारी एकही रेल्वे धावत नाही. यामुळे सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार करून ...
वाशिम : गेल्या वर्षभरापासून अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर मुंबईकडे जाणारी एकही रेल्वे धावत नाही. यामुळे सीएसएमटी-जालना जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार करून ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे डीआरयुसीसी सदस्य महेंद्रसिंग गुलाटी यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली.
गुलाटी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, पूर्णा - अकोला रेल्वे मार्गावरून थेट मुंबईला जाण्यासाठी एकही रेल्वे नाही. या मार्गावरील प्रवाशांना मुंबईस जायचे असेल, तर नांदेड, परभणी किंवा अकोला येथील रेल्वे स्थानक गाठावे लागते. विशेष म्हणजे हिंगोली - वसमत येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे औंढा नागनाथ, नरसी नामदेव येथील संत नामदेव यांचे जन्मस्थान आणि नांदेडमधील गुरुद्वारा येथे पंजाब येथून शीख बांधव दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार केल्यास या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे, असे गुलाटी यांचे म्हणणे आहे.
निवेदन देतेवेळी वाशिम येथील व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा, सचिव भारत चंदनाणी, उपाध्यक्ष नंदकिशोर राऊत, गोविंद वर्मा, विनोद बोरा आदींची उपस्थिती होती.
...................
कोट :
पूर्णा - हिंगोली - वाशिम ते अकोला या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन १३ वर्षे झाली आहेत. असे असताना रेल्वे विभागाकडून दैनंदिन एकही एक्स्प्रेस रेल्वे चालू करण्यात आलेली नाही, ही मोठी शोकांतिका आहे. आता किमान पूर्णा - अकोला मार्गावरून पुणे आणि मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.
- महेंद्रसिंग गुलाटी
डीआरयुसीसी सदस्य, द. म. रे., नांदेड