‘रानमाळ-२०१७’ महोत्सवाला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद!
By admin | Published: May 30, 2017 01:43 AM2017-05-30T01:43:19+5:302017-05-30T01:43:19+5:30
सहभागी शेतकऱ्यांच्या मालाची विक्री ठप्प : स्थळ चुकीचे निवडल्याच्या प्रतिक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कृषी विभाग व ‘आत्मा’मार्फत तब्बल साडेतीन लाख रुपये खर्चून आयोजित करण्यात आलेल्या ‘रानमाळ महोत्सव-२०१७’ला ग्राहकांमधून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सोमवार, २९ मे रोजी दिसून आले. यंदा या महोत्सवाकरिता निवडलेले स्थळ पूर्णत: चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत वाशिम येथील स्वागत लॉनमध्ये २८ मे पासून ३० मे पर्यंत ‘रानमाळ महोत्सव २०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी व शेतकरी उत्पादक गटांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांची थेट भेट घालून देत ग्राहकांना कुठल्याही मध्यस्थाविना भेसळविरहित धान्य, फळे, भाजीपाला यासह इतर उत्पादने मिळवून देणे तद्वतच यायोगे शेतकऱ्यांनाही त्यांच्या मालाचे योग्य दाम मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे. या महोत्सवासाठी दरवर्षी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानाची निवड केली जाते. तेथे यापूर्वी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीदेखील चांगल्या प्रकारे झाली होती. यंदा मात्र ‘आत्मा’ने स्थळ बदल करीत जुने शहरातील स्वागत लॉनमध्ये हा महोत्सव आयोजित केला. त्या ठिकाणी ग्राहक फिरकायलाही तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहत असून, महोत्सवस्थळी शुकशुकाट जाणवून येत आहे. परिणामी, खेड्यापाड्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असल्याचे दिसून आले.
मान्सूनपूर्व वादळी पावसाची शक्यता असल्यामुळेच सुरक्षित स्थळ म्हणून स्वागत लॉनची महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. जबाबदारी म्हणून रानमाळ महोत्सवाचा युद्धस्तरावर प्रचार-प्रसार करूनही ग्राहकांचा प्रतिसाद का मिळत नाही, हे कळायला मार्ग नाही.
- डी.एल.जाधव, प्रकल्प संचालक, ‘आत्मा’