विभागीय आयुक्तांकडून क्वारंटीन वार्ड, आयसोलेशन वार्डची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 04:59 PM2020-04-08T16:59:02+5:302020-04-08T16:59:07+5:30
जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.
वाशिम : परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील क्वारंटीन वार्ड तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डला भेट देऊन विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी ७ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला संदिग्ध रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तसेच कोरोना बाधित क्षेत्रातून अथवा कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना निगराणीखाली ठेवण्यासाठी जिल्हा महिला रुग्णालय परिसरातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन वार्ड सुरु करण्यात आला आहे. क्वारंटीन वार्डमध्ये ५० व्यक्तींना निगराणीखाली ठेवण्याची क्षमता आहे. या दोन्ही वार्डची ७ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांची उपस्थिती होती. या दोन्ही वार्डमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा आढावा यावेळी सिंह यांनी घेतला. तसेच आवश्यकता भासल्यास वार्डची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पूर्वनियोजन करावे. वार्डमध्ये नियुक्त सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ६ बेडचा स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सज्ज ठेवला असून आवश्यक औषधी, सामग्री उपलब्ध करून दिली. या कक्षासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त सिंह यांनी दिल्या.