टेरका येथील गौण खनिजाच्या मोजणीवर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:59 PM2019-09-30T17:59:33+5:302019-09-30T17:59:40+5:30
ढीग व्यवस्थित नसल्याचा अभिप्राय असल्याने आणि कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या मंडळ अधिकाºयांचा समावेश असल्याने साशंकता वर्तविली जात आहे.
संतोष वानखडे
वाशिम : मानोरा तालुक्यातील टेरका येथील गौण खनिज अवैध उत्खनन प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर, पंचनामा, कार्यालय व मशिन सील करण्यात आले. त्यानंतर आता संयुक्त पथकाने मोजणी करून तहसिलदारांकडे अहवाल सादर केला. परंतू, या अहवालात गौण खनिजाचा ढीग व्यवस्थित नसल्याचा अभिप्राय असल्याने आणि कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या मंडळ अधिकाºयांचा समावेश असल्याने साशंकता वर्तविली जात आहे.
जिल्हा खनिकर्म विभागाकडून कोणत्याही प्रकारचा परवाना मिळालेला नसताना, मानोरा तालुक्यातील टेरका (ऊ) येथे ३० ते ४० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ३१ आॅगस्टच्या अंकात सचित्र वृत्त प्रकाशित करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. याची तडकाफडकी दखल घेत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी योग्य ती चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश मानोरा तहसिलदारांना दिले होते. दरम्यान या संदर्भात महसूल राज्यमंत्र्यांदेखील रॉयल्टी भरून घेण्याचे आदेश अपर जिल्हाधिकाºयांना दिले होते. टेरका येथील गट नंबर १७/१ व १७/२ मधून आतापर्यंत किती ब्रास गौण खनिज उत्खनन झाले याची निश्चित माहिती काढण्यासाठी सात अधिकाºयांचे संयुक्त मोजणी पथक गठीत करण्यात आले. यामध्ये कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या मंडळ अधिकाºयांचादेखील समावेश असल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. या पथकाने संयुक्त मोजणी करून तहसिलदारांकडे अहवाल सादर केला. सदरील साठ्याचा ढीग योग्यरितीने लावून न ठेवल्यामुळे तसेच खदानीचे जमिनीची प्रारंभिक पातळी उपलब्ध न केल्यामुळे सरासरी खोली घेऊन परिमाण काढण्यात आले आहे. त्यामुळे यावर तक्रारदाराने आक्षेप नोंदविला आहे.
टेरका येथील संयुक्त मोजणी पथकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. कुणाचीही गय केली जाणार नाही.
डॉ. विनय राठोड
जिल्हा खनिकर्म अधिकारी, वाशिम
संयुक्त मोजणी पथकाचा अहवाल प्राप्त झाला आहे. गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असतानाही याकडे दुर्लक्ष का करण्यात आले यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अद्याप त्यांचा खुलासा प्राप्त झाला नाही. खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल.
डॉ. सुनील चव्हाण,
तहसिलदार, मानोरा