अखेर शिक्षकांच्या निवड, वेतनश्रेणीचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 05:39 PM2019-03-26T17:39:40+5:302019-03-26T17:39:52+5:30
वाशिम : १२ व २४ वर्ष सेवा दिलेल्या शिक्षकांना चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्याचा मुहूर्त अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला गवसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : १२ व २४ वर्ष सेवा दिलेल्या शिक्षकांना चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्याचा मुहूर्त अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला गवसला आहे. प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीचे गठण केले असून, या समितीला २९ मार्चपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत १२ व २४ वर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांना चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागू करण्याचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. याबाबत संबंधित शिक्षकांकडून वारंवार जिल्हा परिषद स्तरावर मागणी करण्यात येत होती. आता वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून या मागणीची दखल घेण्यात आली असून, पात्र शिक्षकांना चटोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागू करण्यासाठी प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्रा.) गजानन डाबेराव यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहे. पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी प्रस्तावांची छाननी व पडताळणी या समितीमार्फत करण्यात येणार असून, ही प्रक्रिया येत्या २९ पर्यंत पूर्ण करून आपला अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देण्यासाठी ३१ मे २००१ आणि २३ आॅक्टोबर २०१७ च्या निर्णयातील तरतुदींचे तंतोंतत पालन करून प्राप्त प्रस्तावांची छाननी व पडताळणी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येत्या २९ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्यात येईल.
-गजानन डाबेराव
प्रभारी शिक्षणाधिकारी (प्रा.)
जि.प. वाशिम