एक लाख हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन!
By admin | Published: October 16, 2015 02:01 AM2015-10-16T02:01:02+5:302015-10-16T02:01:02+5:30
कोरडवाहू शेतकरी संकटात; जमिनीत ओलच नाही!
वाशिम: खरिपात निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरलेला बळीराजा रब्बी हंगामात स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नातून मशागतीच्या कामात व्यस्त आहे. कृषी विभागाने एक लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन केले आहे, तर दुसरीकडे सिंचनाची सुविधा असणार्या शेतकर्यांसमोर नादुरूस्त विद्युत रोहित्राने नवीन संकट निर्माण केले आहे. निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी पुरता खचून गेला आहे. अनियमित व अल्प पावसामुळे खरिपातील पिके हातची गेली. शेतमालाच्या उत्पन्नात प्रचंड घट येत असल्याने लागवड खर्चही वसूल होत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यातील शेतकर्यांवर ओढवली आहे. आता शेतकर्यांची सर्व भिस्त रब्बी पिकावर आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार, रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी होणार आहे. सर्वाधिक क्षेत्रफळावर अर्थात ७0 हजार ८९१ हेक्टरवर हरभर्याच्या पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. गहू पिकाचा पेरा २६ हजार हेक्टर, रब्बी ज्वारी दोन हजार हेक्टर, मका ४00 हेक्टर, सूर्यफूल १६00 हेक्टर असे एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन केले. गतवर्षी ७७ हजार ११ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस असतानाही कृषी विभागाने एक लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज वर्तविला आहे. रिसोड तालुक्यात सर्वाधिक ३0 हजार ९00 हेक्टरवर पेरणीचा अंदाज वर्तविला असून, त्याखालोखाल वाशिम २१ हजार ४00 हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे.