रेबीज लसींचा तुटवडा: श्वानदंशाचे रुग्ण ‘रेफर टू अकोला’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 02:40 PM2019-06-28T14:40:13+5:302019-06-28T14:40:21+5:30
रेबीज लसींचा तुटवडा निर्माण झाला असून अशा प्रकारातील रुग्णांना थेट ‘रेफर टु अकोला’ केले जात असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : रुग्णांच्या सेवेसाठी सदैव कार्यतत्पर असणे अपेक्षित असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध स्वरूपातील असुविधांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रानडुक्कर, श्वानदंश झाल्यानंतर जीवघेण्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी त्यास द्याव्या लागणाऱ्या रेबीज लसींचा तुटवडा निर्माण झाला असून अशा प्रकारातील रुग्णांना थेट ‘रेफर टु अकोला’ केले जात असल्याचे दिसून येत आहे.
९ जून रोजी शेतात काम करताना पांगरखेड येथील सोनू उर्फ गोविंदा संपत धबडधाव आणि सुनील सुभाष गावंडे या दोन युवकांवर रानडुकराने हल्ला केल्याने दोघेही जबर जखमी झाले. यासह २५ जून रोजी दुधाळा येथे शेतात काम करित असताना शिवकन्या राजाराम जाधव आणि सुरेश चिनकू काळे या दोघांवर रानडुकराने हल्ला करून चावा घेतला. एकाच महिन्यात घडलेल्या या घटनांमधील रुग्णांना उपचाराकरिता शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र रेबीज लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी अकोला येथे धाव घ्यावी लागली. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
तथापि, आरोग्य विभागाने ही बाब लक्षात घेवून रेबीज लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
शिरपूर प्राथमिक आरोग् केंद्राचा कारभार वाºयावर!
शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर परिसरातील ५९ गावांमधील रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. असे असताना रुग्णांची गैरसोय होत आहे. २४ जूनच्या रात्री संजय मोतीराम पोफळे या इसमास त्याच्या भावाने डोक्यात दगड मारून जखमी केले. पोलिसांनी संजयला उपचारासाठी शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते; तर बिनपगारी रखवाली करणारा एक व्यक्ती झोपून होता. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव संजयला मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. यावरून शिरपूर ‘पीएचसी’चा कारभार पूर्णत: वाºयावर असल्याचे दिसून येत आहे.