गैरमार्गाने लर्निंग लायसन्स प्राप्त करणारे कारवाईच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:18+5:302021-06-19T04:27:18+5:30
लोकाभिमुख सुविधांचा गैरवापर होऊ नये, यासाठी संगणकीय प्रणालीत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रणालीचा गैरवापर करून, लर्निंग लायसन्स ...
लोकाभिमुख सुविधांचा गैरवापर होऊ नये, यासाठी संगणकीय प्रणालीत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या प्रणालीचा गैरवापर करून, लर्निंग लायसन्स प्राप्त करणाऱ्या अर्जदाराची तपासणी करण्यात येऊन गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त केल्याचे निदर्शनास आल्यास, संबंधितांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच मोटार वाहन कायदा १९८८ कलम १९ (इ) अन्वये अनुज्ञप्ती प्राप्त करण्यास कायमस्वरूपी अपात्र ठरेल, अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल. गैरमार्गाने शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करण्यास साहाय्य करणाऱ्या अनधिकृत व्यक्ती, मध्यस्थ, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, सायबर कॅफे यांच्याविरुद्धदेखील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल. मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांची अनुज्ञप्ती रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे सय्यद यांनी सांगितले. नागरिकांनी गैरप्रकार करून, शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) प्राप्त करून देणाऱ्या व्यक्ती, संस्थांची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास कळविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
..................
बाॅक्स :
प्रणालीचा गैरवापर टाळा- सैय्यद
केंद्रीय मोटार वाहन नियम ११ अन्वये शिकाऊ अनुज्ञप्ती अर्ज करताना, उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परीक्षा देणे अनिवार्य आहे. संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे, चिन्हांचे व वाहन चालकांच्या जबाबदाऱ्यांचे महत्त्व समजावे, हा त्यामागील उद्देश आहे. ऑनलाइन प्रणालीचा वापर करताना, पालकांनी त्यांच्या पाल्यास सदर परीक्षेचे महत्त्व पटवून द्यावे, तसेच या प्रणालीचा गैरवापर होणार नाही, याची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे मत समरीन सैय्यद यांनी व्यक्त केले.