बनावट हॉस्पिटलवर छापा; बोगस डॉक्टरला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 06:51 PM2023-06-08T18:51:26+5:302023-06-08T18:51:56+5:30
मालेगाव तालुक्यातील ग्राम मारसूळ येथील एका बनावट डॉक्टराला ताब्यात घेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
संतोष वानखेडे
वाशिम: कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण न घेता स्वतः डॉक्टर असल्याचे भासवतात व रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार करतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ८ जून रोजी मालेगाव तालुक्यातील ग्राम मारसूळ येथील एका बनावट डॉक्टराला ताब्यात घेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
मालेगाव तालुक्यातील मारसूळ या गावात बनावट डॉक्टर असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाल्यावरून परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या पथकाने आरोग्य विभागाच्या समन्वयाने दि.०७ जून, २०२३ रोजी दवाखान्यावर छापा टाकला. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात औषध साठा ज्यामध्ये आयव्ही फ्लुईड, ॲन्टी कोल्ड टॅबलेट, स्टेरॉईड इंजेक्शन, ब्राँको डायलेटर इंजेक्शन, ॲन्टी पायरेटीक इंजेक्शन व टॅबलेट, ॲन्टासिड, पेन किलर इंजेक्शन व टॅबलेट, आयव्ही सेट, स्काल्प व्हेन सेट, ड्रेसिंग मटेरियल व इतर वैद्यकीय वस्तू मिळून आल्या. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शिक्षण पदवी व परवाना नसताना सदर व्यक्ती हा स्वतः डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांच्या आरोग्याशी खेळत होता.
ही कारवाई परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाभांडे, हवालदार मिसार, पोलीस शिपाई घुगे, महिला पोलीस शिपाई बेंगाळ यांच्यासह वैद्यकीय पथकातील डॉ. संतोष बोरसे, डॉ.किशोर काळबांडे, दिलीप देवकते यांनी छापा टाकून केली. या प्रकरणी मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष प्रल्हादराव बोरसे यांच्या फिर्यादीवरून पो.स्टे. मालेगाव येथे कलम ३३ महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ अन्वये प्रमोद सुभाषराव घुगे (वय ३९ वर्षे), रा. मारसूळ, ता.मालेगाव, जि. वाशिम या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.