अवैध जुगार अड्ड्यावर छापा; ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By संतोष वानखडे | Published: May 27, 2023 03:50 PM2023-05-27T15:50:03+5:302023-05-27T15:50:19+5:30
आरोपींकडून जुगार साहित्य, नगदी व १ मोबाईल, १५ मोटार सायकली असा अंदाजे चार लाख १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वाशिम : परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षकांच्या पथकाने राजगावजवळील वाशिम-हिंगोली मार्गावरील बंद असलेल्या एका ढाब्यासमोरील अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून चार आरोपींसह ४.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेला वरली मटका जुगाराचा खेळ राजगावनजीक सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे उपरोक्त ठिकाणी छापा मारला असता, राजगाव जवळील बंद असलेल्या ढाब्याजवळ काही इसम प्रतिबंधित वरली मटक्याच्या पैश्यांचा हारजीतवर जुगार खेळताना आढळून आले.
आरोपींकडून जुगार साहित्य, नगदी व १ मोबाईल, १५ मोटार सायकली असा अंदाजे चार लाख १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक भारत लसंते, कर्मचारी प्रेमदास हनमूल, नीलेश तायडे, अमोल कांबळे, रोशन राठोड, अर्चना जाधव यांनी ही कामगिरी पार पाडली.