शेतक-यांसाठी रेल्वेगेटचा मार्ग झाला खुला!
By admin | Published: October 15, 2016 02:39 AM2016-10-15T02:39:08+5:302016-10-15T02:39:08+5:30
अकोला-पूर्णा या रेल्वे मार्गावरील ११६ क्रमांकाचे रेल्वे गेट तात्पुरते खुले; लवकरच उर्वरित कामही पूर्णत्वास.
वाशिम, दि. १४- शहरातून गेलेल्या अकोला-पूर्णा या रेल्वे मार्गावर असलेल्या तामसाळा, अंजनखेडा, घोडबाभुळ शेतशिवारातील शेतकर्यांना अडचणीचे ठरलेले ११६ क्रमांकाचे रेल्वे गेट शुक्रवारी खासदार भावना गवळी यांच्या प्रयत्नाने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी शेतकर्यांना ये-जाकरण्याकरिता तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून दिले. लवकरच याला पर्याय म्हणून उर्वरित कामही पूर्णत्वास जाणार आहे.
वाशिम शहरातील पाळेश्वर ते अंजनखेडा या रस्त्यावर रेल्वेचे गेट क्रमांक ११६ असून, या परिसरात तामसाळा, अंजनखेडा, घोडबाभूळ शेतशिवारातील असंख्य शेतकर्यांची शेती आहे. या शेतकर्यांना शेती उत्पादनाच्या दळणवळणाकरिता हा एकमेव रस्ता होता; परंतु या रस्त्यावर रेल्वे प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपूर्वी वाढणार्या रेल्वे गाड्यांच्या वेळांमुळे रेल्वे प्रशासनाच्या आदेशाने वरील रस्ता कायमस्वरुपी बंद केला. यावर्षी शेतात झालेले उत्पादन घरापर्यंंंंंत आणता येत नसल्याने याचा मनस्ताप शेतकर्यांना सहन करावा लागत होता. यासंदर्भात शेतकर्यांनी खासदार गवळी यांच्याकडे तक्रार नोंदविली. याची दखल घेत भावना गवळी यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करुन ४ ऑक्टोबर रोजी रेल्वेचे नांदेड येथील वरिष्ठ अधिकारी अकोला व वाशिम येथील अधिकारी यांच्या उपस्थितीत तात्पुरत्या स्वरुपात सदर रस्ता खुला करुन घेतला.
लवकरच याला पर्याय म्हणून उर्वरित कामही पूर्णत्वाकडे जाणार असल्याचे खासदार गवळी यांनी सांगितले. सदर रस्ता खुला करण्याकरिता भावना गवळी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकर्यांची यावेळी उपस्थिती होती.
रेल्वे प्रशासनातील अधिकारी एन.जी.श्रीनिवासन, एन.चंद्रमोहन, सर्वेश कुमार यांच्याशी चर्चा करताना गवळी यांनी गेट क्रमांक ११६ बरोबरच केकतउमरा येथील अंडरब्रिजमधील साचत असलेल्या पाण्याच्या त्रासामुळे तेथील ग्रामस्थांची दररोज होणारी तारांबळ लक्षात घेऊन सदर पाण्याची व्यवस्था करावी, त्या ब्रिजचा विस्तार करणे, पुसद रोड आणि हिंगोली रोड येथील पुलाची कार्यप्रक्रिया पूर्ण करणे, वाशिम स्टेशनवरुन विविध प्रकारच्या रेल्वे गाड्या वाढविणे, प्लॉट फार्मवरील शेडचा विस्तार करणे, आदी कामांचे निर्देश गवळी यांनी दिले.