वाशिममध्ये आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज: लेंढी नदीला पूर, वाशिम तालुक्यातही पाऊस मनसोक्त बरसला
By संतोष वानखडे | Published: July 14, 2024 06:13 PM2024-07-14T18:13:34+5:302024-07-14T18:13:51+5:30
सर्वदूर पाऊस; नदी-नाले झाले वाहते...
संतोष वानखडे / वाशिम : जिल्ह्यात रविवारी (दि.१४) सकाळपासूनच सार्वत्रिक स्वरुपात दमदार पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाले वाहते झाले. वाशिम तालुक्यातही दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून, पिकांना संजीवणी मिळाली.
यंदा जिल्ह्यात मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने बहुतांश पेरण्यादेखील वेळेवर सुरू झाल्या. जिल्ह्यातील वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्याच्या तुलनेत रिसोड व मालेगाव तालुक्यात सुरूवातीपासून सार्वत्रिक स्वरुपात दमदार पाऊस झाला. वाशिम व मानोरा तालुक्याला दमदार पावसाची प्रतिक्षा कायम होती. दरम्यान, शनिवारी सायंकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तूरळक प्रमाणात पाऊसही झाला होता. रविवारी (दि.१४) सकाळी ८:३० वाजतापासूनच जिल्ह्यात पावसाला सर्वदूर सुरूवात झाली. वाशिम शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही दमदार पाऊस झाला. दिवसभर थोडी-थोडी विश्रांती घेत पाऊस बरसल्याने शेतकरी सुखावला. दमदार पाऊस झाल्याने जलस्त्रोतात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड, कारंजा व मानोरा तालुक्यातही सार्वत्रिक स्वरुपात दमदार पाऊस झाला. हवामान खात्याने पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
१४ दिवसांत सरासरी १२७ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या १४ दिवसांत सरासरी १२७ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक १५४.९० मि.मी. पाऊस मालेगाव तालुक्यात तर सर्वात कमी ९०.९० मि.मी. पाऊस कारंजा तालुक्यात झाला. जुलै महिन्यात सरासरी २४३.६० मि.मी. पाऊस अपेक्षित होता. त्यापैकी १४ जुलैपर्यंत सरासरी १२७ मि.मी. पाऊस झाल्याने एका महिन्याच्या सरासरीत या १४ दिवसांत ५२.१० टक्के पाऊस झाला.
१४ दिवसांत कोणत्या तालुक्यात किती पाऊस?
तालुका / पाऊस
वाशिम / १३६.२०
रिसोड / १११.१०
मालेगाव / १५४.९०
मं.पीर / १३१.००
मानोरा / १४१.००
कारंजा / ९०.९०
लेंढी नदीला पूर
सततच्या पावसामुळे एरंडा (ता.मालेगाव) येथील लेंढी नदीला पुर आला. रविवारी दुपारी १ वाजता एरंडा जवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. शेतात गेलेल्या महिला या पुलाच्या एका बाजुला अडकल्या होत्या. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सायंकाळी वाहतूक पूर्ववत झाली. या पुरामुळे सायंकाळपर्यंत वाशिम ते किन्हीराजा या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.