पावसाने फिरवली पाठ; शेतकरी हवालदिल

By admin | Published: July 1, 2014 02:35 AM2014-07-01T02:35:46+5:302014-07-01T02:37:32+5:30

वाशिम जिल्हय़ात ९६ टक्के शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडल्या

Rain; Hire the farmer | पावसाने फिरवली पाठ; शेतकरी हवालदिल

पावसाने फिरवली पाठ; शेतकरी हवालदिल

Next

वाशिम : जून महिना संपला तरी अद्यापपर्यंत जिल्हय़ात शेतकर्‍यांना दिलासा देणारा पाऊस पडलेला नाही. ओलिताची थोडीफार सोय असणार्‍या काही भागातील शेतकर्‍यांनी चार टक्के क्षेत्रात पेरण्या केल्या होत्या; परंतु आता विहिरीचे पाणी आटल्याने त्यांच्या पेरण्या पाण्याअभावी उलटण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित ९६ टक्के शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडल्या असून, यावर्षीचा खरीप हंगाम पावसाअभावी हातचा जाण्याच्या भीतीने जिल्हय़ातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्हय़ात मागील वर्षी सन २0१२ च्या पावसाळय़ात जिल्हय़ाच्या वार्षिक पावसाच्या सरासरीच्या १५0 टक्के एवढा पाऊस पडला होता. मागील वर्षी ६ जूनलाच पावसाची दमदार सुरुवात झाली होती. जून महिन्यातच पावसाळय़ात पडलेला पाऊस वार्षिक सरासरीच्या निम्म्या एवढा पडला होता. त्यामुळे जून अखेर ८७ टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. पिकेदेखील चांगली वाढीला लागली होती. यावर्षी स्थिती अगदी उलट आहे. जून महिन्यात जिल्हय़ात कुठे कुठे अगदी तुरळक स्वरुपात पाऊस पडला आहे. खरिपाच्या लागवडीखाली येणार्‍या जिल्हय़ातील ४ लाख २७ हजार हेक्टर क्षेत्रापैकी थोडीफार ओलिताची सोय असलेल्या १७ हजार हेक्टर चार टक्के क्षेत्रात शेतकर्‍यांनी जूनमध्ये पाऊस येणारच, असे गृहीत धरुन पेरण्या केल्या होत्या. परंतु संपूर्ण जून महिना उलटला तरीही अगदी नाममात्र आणि सरी स्वरुपाचा पाऊस झाला. मुरवणी स्वरुपाचा पाऊस अद्यापही झाला नसल्याने जिल्हय़ातील जवळपास चार लाख १0 हजार हेक्टर टक्के क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या आहेत. उडीद, मुगाच्या पेरणीचा कालावधी आता उलटून गेला असून, आता जुलै महिन्यात पाऊस आला तर शेतकर्‍यांना सोयाबीन, कापूस, तूर व संकरित ज्वारीची पेरणी करावी लागणार आहे. तसेच यापूर्वी पेरणी केलेल्या १७ हजार हेक्टर क्षेत्रातील पेरण्या सध्या पावसाअभावी करपून जात असल्याने त्या शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागणार आहेत. एकंदरीत आता जुलै महिन्यात येणार्‍या पावसानंतर जिल्हय़ातील जवळपास १00 टक्के शेतकर्‍यांना पेरण्या कराव्या लागणार आहेत. या दृष्टीने शेतकर्‍यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या असून, पाऊस कधी येतो, याची प्रतीक्षा हवालदिल शेतकरी करीत आहेत.

Web Title: Rain; Hire the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.