जिल्ह्यात दुसऱ्याही दिवशी पावसाची रिपरिप
By admin | Published: July 17, 2017 02:45 AM2017-07-17T02:45:21+5:302017-07-17T02:45:21+5:30
पिके बहरली : शेतकऱ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेला पाऊस रविवारीदेखील दिवसभर कायम होता. या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे खरिपातील संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाले असून, दुबार पेरणीच्या सावटाखाली असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील पिके तरारली आहेत. शनिवारच्या पावसाची सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी २३ मिलिमीटर एवढी नोंद झाली. त्यात वाशिम ३०.४० मि.मी., मालेगाव १७ मि.मी., रिसोड ४५ मी.मी., मंगरूळपीर १३ मि.मी., मानोरा मि.मी. आणि कारंजात १३ मि.मी. पाऊस कोसळला. रविवारीदेखील सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.