पावसाची रिपरिप कायम; पैनगंगा दुथडी भरून वाहली!
By admin | Published: July 12, 2016 12:40 AM2016-07-12T00:40:22+5:302016-07-12T00:40:22+5:30
वाशिम जिल्ह्यात पावसाची सरासरी ओलांडली : सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस.
वाशिम : जिल्ह्यात सर्वदूर गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोरडेठाण्ण पडलेले नदी-नाले वाहते झाले असून वाशिम-हिंगोलीच्या सिमेवरील कन्हेरगांव नाका येथील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहली. खरिपातील पिकांसाठी अत्यंत पोषक असलेल्या या पावसामुळे यंदाचा मोठा दुष्काळ सोसणार्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने घटलेल्या पर्जन्यमानामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात भीषण दुष्काळ उद्भवला. नदी, नाले, सिंचन प्रकल्प यासह सर्वच जलस्त्रोत कोरडेठाण्ण पडल्यामुळे जिल्हावासीयांची प्रचंड तारांबळ उडाली. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यातील जून महिणाही मोठय़ा पावसाअभावी कोरडाच गेल्याने शेतकर्यांसह संपूर्ण जिल्हावासीयांमध्ये चिंता व्यक्त होत होती. अशातच ८ जुलैपासून दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाची ही झड चौथ्या दिवशीही (११ जुलै) कायम असून यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले, सिंचन प्रकल्पांची पाणीपातळी समाधानकारकरित्या वाढली आहे.
३५ मिलीमिटर पावसाची नोंद
जिल्ह्यात सोमवार, ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ३५ मिलीमिटर पाऊस कोसळल्याची नोंद घेण्यात आली. यात वाशिम ३६ मिलीमिटर, मालेगाव ३८ मिलीमिटर, रिसोड ३0 मिलीमिटर, मंगरुळपीर ३६ मिलीमिटर, मानोरा २४ मिलीमिटर; तर कारंजा येथे ४४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. यायोगे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात एकंदरित सरासरी ३0४ मिलीमिटर पाऊस कोसळला आहे.