पावसाची उघडिप; पेरण्या खोळंबल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:33 PM2018-06-16T15:33:26+5:302018-06-16T15:33:26+5:30
गेल्या तीन ते चार दिवसांपासून मात्र पावसाचे वातावरण गायब होऊन कडक उन्ह तापत असल्याने खरीप हंगामातील पेरण्या पुरत्या खोळंबल्या आहेत.
वाशिम : मृग नक्षत्र लागायच्या सुरूवातीला व नंतर काहीदिवस ढगाळी वातावरणासह पाऊस कोसळल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मात्र पावसाचे वातावरण गायब होऊन कडक उन्ह तापत असल्याने खरीप हंगामातील पेरण्या पुरत्या खोळंबल्या आहेत. या प्रतिकुल वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून पेरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून आहे.
गतवर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ३० ते ३५ टक्के पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे रब्बी हंगामावर त्याचा विपरित परिणाम होऊन बहुतांश शेतकºयांना नापिकीचा सामना करावा लागला. तसेच यंदाच्या उन्हाळ्यात लवकरच नदी-नाले, तलाव, विहिरी, हातपंप कोरडे पडल्याने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले. अशात जूनच्या १ तारखेला वातावरणात अपेक्षित बदल होत दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे किमान यंदा तरी चांगला पाऊस होऊन खरीप हंगामाील पेरण्यांचा मार्ग मोकळा होईल, अपेक्षित उत्पन्न घेता येईल, अशी अपेक्षा शेतकºयांमधून वर्तविण्यात येत होती. असे असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण गायब होत कडक उन्ह तापत असल्याने पेरणीच्या कामांना ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून येत आहे.