दहा दिवसांपासून पावसाची दडी : पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 03:32 PM2018-08-11T15:32:54+5:302018-08-11T15:34:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मागील दहा दिवसांपासून वरुणराजाने पाठ फिरवल्याने खरीप पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. पिकाला वाचविण्यासाठी काही शेतकरी तुषार सिंचनांचा आधार घेत आहेत. काही गावातील हलक्या शेतजमीनीवरील सोयाबीन पिकांनी माना खाली टाकल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभाला निसर्गाने साथ दिल्यावर परिसरातील शेतकरी आनंदीत होता . पेरण्या योग्यवेळी अडथळाविना पार पडल्या त्यानंतर मात्र पावसाची रिपरिप सुरु झाल्याने काही प्रमाणात जास्त पाण्यामुळे तुरीच्या पिकांना फटका बसला, मात्र गेल्या दहा दिवसापासून वरुणराजाने पाठ फिरविल्याने हिरवीगार बहरणारी माळरानावर संकट सापडण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत . ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय आहे ते स्पिकलरच्या सहाय्याने पिके वाचविण्याचा प्रयत्न करित आहे .
ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नाही त्यांच्यासाठी थांबलेला पाऊस धोकादायक ठरत आहेत. जुलै महिन्यात सतत ८ दिवस पावसाची रिपरिप सुरु होती, त्या समाधानकारक पावसावर परिसरातील शेतकºयांची पिके थोडी बहरली . उघडीप मिळाल्यावर महागडी किटकनाशक औषधी घेवून मोठ्या प्रमाणावर फवारण्या केल्या त्या निरर्थक ठरत आहेत.
परिसरात खरीप हंगामावर शेतकºयांची भिस्त आहे. मागील तीन चार वषार्पासून सोनल प्रकल्पात १०० टक्के जलसाठा होत नसल्याने आवश्यक त्या प्रमाणात रब्बी पिकांचा लाभ घेण्यापासुन शेतकºयांना वंचीत रहावे लागत आहे . येत्या आठ दिवसांत परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही तर हलक्या जमीनीवरील पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी पावसाने सलग ८ ते १० दिवसापासून उघडीप दिल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती बिकट बनली आहे.पावसासाठी शेतकरी देवाकडे साकडे घालतांना दिसून येत आहे. येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास शेतकºयांचे हातचे पीक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुषार सिंचनाचा आधार
गत दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून पावसाची प्रतिक्षा करीत आहे. तर ज्या शेतकºयाकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते शेतकरी आपले पिक वाचविण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घेतांना दिसून येत आहे. परंतु ज्या शेतकºयांकडे सिंचनाची व्यवस्थाच नाही अश्या शेतकºयांच्या हातचे पीके जाण्याची शक्यता दिसून येत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.