वाशिम जिल्हयात पावसामुळे पिकांना संजिवनी, तूट कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 02:12 PM2019-07-27T14:12:25+5:302019-07-27T14:12:33+5:30
वाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत १५ ते २० दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस २५ जुलै व २६ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हयात सर्वदूर बरसल्यामुळे पिकांना संजिवनी मिळाली आहे. दुसरीकडे १ जून ते २५ जुलैपर्यंत अपेक्षित सरासरी ३७२ मीमी असताना प्रत्यक्षात १९५ मीमी पर्जन्यमान झाल्याने तूट कायम आहे. येत्या दोन दिवसात विदर्भात चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.
गतवर्षीदेखील पावसाळ्यात नियमित पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन घेता आले नव्हते. गतवर्षीची कसर यावेळी भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले होते. परंतू, यावर्षी मान्सून लांबल्याने मूग, उडदाची पेरणी होऊ शकली नाही. सोयाबीन, तूर व अन्य वाणांची पेरणी झाल्यानंतर १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी, पिके संकटात सापडली होती. २५ जुलै रोजी दुपारनंतर जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना संजिवणी मिळाली. २६ जुलै रोजीदेखील जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिमझिम असल्याने पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, दमदार पाऊस नसल्याने पावसाची तूट कायम आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ जून ते २५ जुलै या कालावधीत ही सरासरी ३७६.०६ मिलीमिटर अपेक्षीत असते. मान्सूनचे विलंबाने आगमन, त्यानंतरही पावसात सातत्य नसणे आणि दमदार पाऊस नसणे यामुळे १ जून ते २५ जुलै या कालावधीत प्रत्यक्षात अतिशय कमी पर्जन्यमान झाले आहे. १ जून ते २५ जुलै या कालावधीत पर्जन्यमापकाद्वारे घेतलेले सरासरी पर्जन्यमान १९५.०७ मीमी असून, याची टक्केवारी ५२.४३ अशी आहे. अपेक्षित सरासरीपेक्षा ४८ टक्के कमी पर्जन्यमान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. १ जून ते २५ जुलै या दरम्यान वाशिम तालुक्यात एकूण २३७.४४ मीमी, मालेगाव २०२.३९ मीमी, रिसोड २२९.६४, मंगरूळपीर १९७.७१ मीमी, मानोरा १५४.९५ मीमी आणि कारंजा तालुक्यात एकूण १४८.३३ मीमी पर्जन्यमान झाले. २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.९४ मीमी पाऊस झाला. २६ जुलै रोजीदेखील जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. विदर्भात २८ जुलैपर्यंत चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.
पर्जन्यमानाच्या नोंदीत तफावत
जिल्ह्यात पर्जन्यमापकाद्वारे तसेच महावेध वेबसाईटवरून पर्जन्यमानाची नोंद घेतली जाते. या दोन्ही नोंदीत प्रचंड तफावत असल्याने नेमकी आकडेवारी कोणती ग्राह्य धरावी, याबाबत संभ्रमावस्था आहे. पर्जन्यमापकाद्वारे घेतलेल्या आकडेवारीनुसार १ जून ते २५ जुलै या कालावधीत सरासरी १९५.०८ मीमी पर्जन्यमान झाले तर महावेध वेबसाईटवरून घेतलेल्या आकडेवारीनुसार सरासरी २३२.०७ मीमी पर्जन्यमान झाले. या दोन्ही नोंदीत जवळपास १० टक्क्याचा फरक असल्याचे स्पष्ट होते. पर्जन्यमापकाद्वारे घेतलेल्या नोंदीनुसार २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १३.९४ मीमी पाऊस झाला तर महावेध वेबसाईटवरून घेतलेल्या नोंदीनुसार २५ जुलै ते २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ०.६७ मीमी पाऊस झाला.
काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती
यावर्षी पाऊस सार्वत्रिक स्वरुपाचा नसल्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. २५ व २६ जुलै रोजी सर्वदूर पाऊस असताना मानोरा तालुक्यात उमरी मंडळात पाऊस नव्हता. या मंडळातील जमिनीला भेगा पडल्या असून, सोयाबीन, तूर आदी पिके सुकून जात आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येते. अशीच परिस्थिती मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये आहे.