‘बॅरेजेस’मुळे अडले पावसाचे पाणी
By admin | Published: July 7, 2017 01:10 AM2017-07-07T01:10:09+5:302017-07-07T01:10:09+5:30
सिंचनाची सोय : पैनगंगा नदीतील पाण्यामुळे शेतकरी सुखावले!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सिंचनाचा वाढत चाललेला अनुशेष भरून काढण्यासाठी ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ‘बॅरेजेस’मुळे कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे शक्य झाले आहे. यंदा केवळ दोन वेळा झालेल्या मोठ्या पावसानंतर बॅरेजेस क्षेत्रात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोऱ्याच्या दुभाजकावर येत असून, जिल्ह्यात पूर्वीपासूनच सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. तो दूर करण्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाने १२ फेब्रुवारी २००९ रोजी जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील वरूड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ बॅरेजेसची कामे हाती घेतली. शासनानेदेखील या कामांकडे विशेष लक्ष पुरविल्यामुळे सध्या सर्वच बॅरेजेसची कामे पूर्ण होऊन त्यात जलसाठा होऊ लागला आहे.
पैनगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या बॅरेजेसमुळे वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य झाले असून, सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाल्याने बॅरेज परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.
७ हजार ६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली
वाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या ११ बॅरेजेस प्रकल्पांमुळे वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून, यासाठी केवळ ३७२.५७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली.
पैनगंगा नदीवर नव्यानेच उभारण्यात आलेल्या बॅरेज प्रकल्पांमध्ये यंदा मोठा जलसाठा निर्माण होणार असून, नजीकच्या शेतजमिनींचे नुकसान होऊ नये अथवा प्रकल्पांचे दरवाजे बंद केल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, याची जलसंपदा विभागाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. यासह हे प्रकल्प नवेच असल्यामुळे बांधकामात कुठे काही त्रुटी राहिल्यात काय, याचीही चाचपणी केली जाते.