प्रकल्पाच्या उभारणीसाठी केलेल्या पर्यायी रस्त्याची पावसात दुदर्शा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 02:52 PM2018-06-10T14:52:14+5:302018-06-10T14:52:14+5:30
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात मिर्झापूर-घाटा हा रस्ता गेल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पर्यायी रस्त्याची उभारणी करण्यात आली; परंतु या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता चिखलमय झाला, तर पूर्वीचा रस्ता पाण्यात गेला आहे.
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात मिर्झापूर-घाटा हा रस्ता गेल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पर्यायी रस्त्याची उभारणी करण्यात आली; परंतु या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पहिल्याच पावसात हा रस्ता चिखलमय झाला, तर पूर्वीचा रस्ता पाण्यात गेला आहे. त्यामुळे मिर्झापूर-घाटा येथील ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मिर्झापूर परिसरात सिंचनक्षेत्रात वाढ करण्यासह पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे ६५० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे मिर्झापूर-घाटा हा रस्ता बुडित क्षेत्रात गेला आहे. त्यामुळे शेतकºयांसह ग्रामस्थांच्या वहिवाटीचा प्रश्न उपस्थित होत असल्याने ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्यासाठी या प्रकल्पाचे कामही बंद पाडले होते. अखेर प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळून पर्यायी रस्त्यालाही मंजुरी देण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाचे काम वेगाने करण्यात आले आणि पर्यायी रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले; परंतु या रस्त्याचे काम करताना दबाई व्यवस्थीत झाली नाही, तसेच डांबरीकरणाचे कामही पूर्ण झाले नसतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मिर्झापूर प्रकल्पात जलसंचय झाला आणि मिर्झापूर आणि घाटावासियांसाठी केलेल्या या नव्या रस्त्यावरून पाणी वाहले. परिणामी हा रस्ता चिखलमय झाला असून, या रस्त्यावर वाहने फसत आहेत. त्यातच पूर्वीचा रस्ता पाण्यात बुडला असल्याने ग्रामस्थांना वहिवाटीत अडचणी येत आहेत. आता पावसाने उसंत घेतली तरी, रस्ता पूर्ण चिखलमय झाला असल्याने या दोन्ही गावांतील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन या रस्त्याचे काम त्वरीत करावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.