नोकरीवर रुजू होण्यापूर्वीच राजेशला गाठले मृत्यूने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 01:15 AM2017-07-20T01:15:11+5:302017-07-20T01:15:11+5:30
पोहा येथील घटना : जेवत असताना झाला सर्पदंश
प्रफुल्ल बानगावकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : नियमित स्वरूपात नोकरी मिळावी, यासाठी त्याने अनेक दिवस तुटपुंजा मानधनावर एका खासगी बँकेत इमानेइतबारे कार्य केले. त्याच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन बँकेनेदेखील त्यास कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, तो १९ जुलैला रुजू होणार होता. मात्र, १८ जुलैच्या सायंकाळी जेवत असताना पायाला झालेल्या सर्पदंशामुळे नोकरीवर रुजू होण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले.
राजेश रतन राठोड (वय ३५ वर्षे, रा. पोहा, ता. कारंजा) असे नाव असलेल्या या युवकाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे उभे गाव हळहळले आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे एका बँकेत रोजंदारीवर नोकरी करित होता. १९ जुलैपासून मात्र बँकेने त्याला कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, तो तयारीत असतानाच १८ जुलैच्या सायंकाळी घरात जेवन करीत असताना राजेशच्या डाव्या पायाला सर्पदंश झाला.
त्यामुळे त्यास प्राथमिक उपचाराकरिता प्रथम ग्रामीण रुग्णालय आणि तेथून अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलविण्यात आले; मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. राजेश राठोड याच्या पश्चात पत्नी, एक छोटी मुलगी, वृद्ध आई-वडील आणि आप्त परिवार आहे. त्याच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून, गावातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.