राजुरा ग्रामपंचायतीने उचलला स्वच्छतेचा विडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:40 AM2021-03-06T04:40:02+5:302021-03-06T04:40:02+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जवळपास हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्यालगत गावातील अनेकांनी घरातील केरकचरा, शेणखत टाकून उकिरडे तयार ...
गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते जवळपास हनुमान चौकापर्यंतच्या रस्त्यालगत गावातील अनेकांनी घरातील केरकचरा, शेणखत टाकून उकिरडे तयार केले आहेत. या उकिरड्यामुळे दुर्गंधी पसरून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव निर्माण होतो. त्याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे दिसत आहे, शिवाय गावात प्रवेश करताच घाण दिसत असल्याने, सौंदर्यीकरणाच्या दृष्टीनेही हे अयोग्य होते. त्यामुळे नवनिर्वाचित प्रभारी सरपंच यशोदाबाई रवणे यांनी ग्रामपंचायतच्या पहिल्याच सभेत गावाच्या मुख्य रस्त्यालगतचे सर्व उकिरडे उचलून गाव स्वच्छ करून सौंदर्यीकरण करण्याबाबतचा विषय सभेत उपस्थित केला. त्याला ग्रा.पं. सदस्य गोपाल पातळे, मोहन कांबळे, आरती प्रकाश बोरजे, हुस्नाबी अलियारखॉ पठाण यांच्यासह उपस्थित सदस्यांनी समर्थन देत, एकमुखाने ठराव पारित केला. या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उकिरडे करणाऱ्यांना ४ मार्च रोजी रीतसर नोटीस बजावून तत्काळ उकिरडे हटविण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
---------
कोट: जनतेच्या आरोग्यासह गावाच्या सौंदर्यीकरण्याच्या दृष्टीने उकिरडे उचलून घाण साफ करणे गरजेचे होते. त्याबाबतचा ठराव पारित करून अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला आहे.
यशोदाबाई रवणे, प्रभारी सरपंच