सदस्यसंख्या कायम ठेवण्यात राकॉं, वंचित आघाडीचा लागणार कस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:47 AM2021-09-15T04:47:29+5:302021-09-15T04:47:29+5:30
संतोष वानखडे वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीवरील स्थगिती उठल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून, यापूर्वीची सदस्यसंख्या ...
संतोष वानखडे
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीवरील स्थगिती उठल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून, यापूर्वीची सदस्यसंख्या कायम ठेवण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडीचा चांगलाच कस लागणार आहे. ओबीसी आरक्षणाचा सर्वाधिक फटका वंचितच्या चार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन जागांना बसला आहे.
वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ सदस्यांची पदे रिक्त झाली. यामध्ये सर्वाधिक फटका वंचित बहुजन आघाडीच्या चार आणि राकॉंच्या तीन जागांना बसला आहे. त्याखालोखाल भाजप व जनविकास आघाडीच्या प्रत्येकी दोन आणि कॉंग्रेस, शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एका सदस्याचे पद रिक्त झाले. यामुळे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबलदेखील बदलले असून, अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे कायम ठेवण्यासाठी तीन पेक्षा अधिक जागा निवडून आणणे राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेचे झाल्याचे मानले जात आहे. वंचित बहुजन आघाडीदेखील जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी असून, यापूर्वीच्या चार जागा निवडून आणण्यात ‘वंचित’च्या स्थानिक पदाधिका-यांचा कस लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीने दोन सदस्यांना डच्चू देत तेथे अन्य उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे यापूर्वीचे निवडून आलेले सदस्य या दोन ठिकाणी नेमके कोणते डावपेच आखतात, यावर बरेच काही अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. कंझरा आणि तळप बु. या दोन गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसला विशेष परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे तसेच वंचित बहुजन आघाडीला उकळीपेन आणि पांगरी नवघरे या दोन गटात प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. यापूर्वीची सदस्यसंख्या कायम राखण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडीला यश येणार का? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
................
दोन जागांसाठी भाजप, जनविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला!
भाजप आणि जनविकास आघाडीच्या प्रत्येकी दोन सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या. यामध्ये भाजप आणि जनविकास आघाडीच्या गटनेत्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे गटनेत्यांना निवडून आणण्यासाठी पक्षाच्या सुप्रिमोकडून कोणते डावपेच आखले जातात यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. प्रत्येकी दोन जागांसाठी भाजप, जनविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून येते.
...............
यापूर्वी कोणत्या गटात कोण निवडून आले?
भर जहागीर - वंचित आघाडी
पांगरी नवघरे - वंचित आघाडी
उकळीपेन - वंचित आघाडी
भामदेवी - वंचित आघाडी
आसेगाव - राष्ट्रवादी कॉंग्रेस
कंझरा - राष्ट्रवादी कॉंग्रेस
तळप बु. - राष्ट्रवादी कॉंग्रेस
कवठा - जनविकास आघाडी
गोभणी - जनविकास आघाडी
कुपटा - भाजप
फुलउमरी - भाजप
काटा - शिवसेना
दाभा - कॉंग्रेस
पार्डी टकमोर - अपक्ष