संविधानविरोधी कारवायांविरोधात वाशिममध्ये रॅली
By संतोष वानखडे | Published: October 31, 2022 04:43 PM2022-10-31T16:43:25+5:302022-10-31T16:49:56+5:30
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारतातील ५६७ जिल्ह्यांत १४ मुद्द्यांच्या संदर्भात विशाल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
वाशिम - भाजपाकडून देशभरात संविधानविरोधी कारवाया सुरू असल्याचा आरोप करीत याविरोधात भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आली.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारतातील ५६७ जिल्ह्यांत १४ मुद्द्यांच्या संदर्भात विशाल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाने सोमवारी रॅली काढली. दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेली रॅली सिव्हिल लाइन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ३ वाजता पोहोचली. यावेळी रॅलीचे रूपांतर सभेत झाले. यावेळी नेतृत्वकर्त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, संविधान द्रोही आणि देशद्रोही असलेल्यांवर बंदी घाला, ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, ईव्हीएम हटाव देश बचाव, ये आजादी झूटी है, देश की जनता भूकी है अशा विविध घोषणांनी मागण्यांचा आवाज बुलंद करण्यात आला.
ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. रवी जाधव, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धम्मदास वाकुडे, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक मिलिंद सुर्वे, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राज्य महासचिव सीताराम वाशिमकर, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोशन गायकवाड, बिनचे जिल्हा संयोजक प्रमोद देवळे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या सुनीता मनवर, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रताप कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदेश गवई आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. रॅलीत शेकडो बहुजन बांधव सहभागी झाले होते.