रिसोडमध्ये खड्डयांसाठी शिवसंग्रामने काढला मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:40 PM2018-07-19T16:40:31+5:302018-07-19T16:40:45+5:30
शिवसंग्रामच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले
रिसोड : शहरातील रस्त्यावर पडलले जीवघेणे खड्डे आणि रिसोड शहरातील समस्यासाठी शिवसंग्रामच्यावतीने गुरूवार (१९ जुलै) रोजी मोर्चा काढण्यात आला. रिसोड शहरातील व्यापाराच्या दृष्टीने आणि शहराचा मुख्य मार्ग असलेल्या सिव्हील लाईन रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पायदळ चालने सुध्दा कठीण झालेले असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आंणि नगर परिषद एकमेकांकडे बोट दाखवून जनतेची दिशाभूल करीत आहेत.
जो रस्ता नगर परिषद स्वतः कडे नाही म्हणून सांगते. तर त्या रस्त्यावरच्या बांधकामाचा टॅक्स न.प. वसुल करते. स्ट्रीट लाईट सुध्दा लावले जातात. रस्त्यावरच्या लोकांची निवडून येण्यासाठी मतेही पाहीजेत. परंतु त्याच रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले तर ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, म्हणून सांगितलं जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवत असताना ३१ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्र खड्डे मुक्त करण्याची घोषणा सरकारने केली होती. याची जाण स्थानिक पुढाऱ्यांना राहली नसल्याच म्हटलं जात आहे. शहरातील मोकाट जनावरे व कुत्रे यांचा प्रश्नासह शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि मोकळया भूखंडावरील घाणीचे साम्राज्य तथा पिण्याचे पाण्याचे नियोजन, महात्मा फुले नगर मधील समस्या साठी शिवसंग्राम रिसोड शहराचे अध्यक्ष विकास झुंगरे यांनी मोर्चाचे आयोजन केले होते.
रिसोड शहरात सर्व पक्षाचे नगर सेवक आहेत. मात्र शहरातील समस्याबाबत विरोधी पक्ष जिवंत नसल्याचेच नेहमी दिसून आले. मोर्चाची सुरुवात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान वाशिम नाक्यापासुन करण्यात आली. मोर्चा पोस्ट ऑफिस चौक, पंचायत समिती, सिव्हील लाईन मार्गे साडेबारा वाजता नगर परिषदेवर धडकला . मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी शहराशी निगडीत असलेल्या समस्या व शहर कसे असले पाहीजेत याबाबत शिवसंग्रामचे विष्णुपंत भुतेकर,डॉ. जितेंद्र गवळी, भागवत गाभणे यांनी मत मांडले. मोर्चा मध्ये शहरातील व्यापारी, नागरीक, महिला व शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाअध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, प्राचार्य विजयराव तुरूकमाने, भागवतराव गाभणे यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष विकास झुंगरे, मैफत इंगळे, संदिप ईरतकर, परवेझ भाई, ईज्जत भाई, रविद्र चोपडे, बाजीराव हरकळ यांनी पुढाकार घेतला. यावेळी शिवसंग्रामच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले.