आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिस स्टेशनवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:59 PM2019-02-23T14:59:02+5:302019-02-23T14:59:19+5:30
शिरपूरजैन (वाशिम) : येथे ६ फेब्रूवारी रोजी घडलेल्या हाणामारी प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी घटनेत जखमी झालेल्या गाभणे भावंडांसह इतर नागरिकांनी शनिवारी स्थानिक पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन (वाशिम) : येथे ६ फेब्रूवारी रोजी घडलेल्या हाणामारी प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी घटनेत जखमी झालेल्या गाभणे भावंडांसह इतर नागरिकांनी शनिवारी स्थानिक पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. दरम्यान, याच प्रकरणात आरोपींचे हात बांधून गावात फिरविल्याप्रकरणी शुक्रवारपासून काही महिलांनी सुरू केलेले साखळी उपोषण आजही सुरूच असल्याचे दिसून आले.
शिरपूर येथील एका ‘फिल्टर वॉटर प्लांट’नजिक सांडपाण्यावरून अंभोरे व गाभणे या दोन गटात शाब्दिक वाद झाला. यादरम्यान अंभोरे गटाने गजानन गाभणे, विलास गाभणे आणि संतोष गाभणे असे तीनजण जखमी झाले होते. दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी प्रकाश अंभोरे, महादेव अंभोरे, विशाल अंभोरे यांच्यासह अन्य पाच ते सात लोकांवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपींपैकी पोलिसांनी महादेव अंभोरे व विशाल अंभोरेसह अन्य एका आरोपीस २० फेब्रूवारीला ताब्यात घेतले. या घटनेतील मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार असून त्यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी घटनेत जखमी गाभणे भावंडांसह नागरिकांनी मोर्चा काढला.
दुसरीकडे याच घटनेतील तीन आरोपींना हात बांधून गावात फिरविल्याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेचा निषेध म्हणून काही महिलांनी अंगिकारलेले साखळी उपोषण शनिवारीही सुरूच असल्याचे दिसून आले.
दोन्ही गटातील लोकांनी कुठलेही अनुचित पाऊल न उचलता शांतता बाळगावी. पोलिसांचा तपास योग्यदिशेने सुरू असून मुख्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल.
- सुरेश नाईकनवरे
पोलिस निरीक्षक, शिरपूर पोलिस स्टेशन