सीएए, एनआरसी समर्थनार्थ रिसोडमध्ये ‘हुंकार रॅली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 03:44 PM2020-01-28T15:44:32+5:302020-01-28T15:44:59+5:30
राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने मंगळवार २८ जानेवारी रोजी रिसोड शहरातील मुख्य मार्गावरून ‘हुंकार रॅली’ काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी) च्या समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने मंगळवार २८ जानेवारी रोजी रिसोड शहरातील मुख्य मार्गावरून ‘हुंकार रॅली’ काढण्यात आली. या रॅलीत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. सातशे मीटर लांबीचा तिरंगा हे या हुंकार रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी ९ वाजताच्या सुमारास हुंकार रॅलीला सुरुवात झाली. सराफा लाईन, मेनरोड, डॉ. कृष्णचंद्र बबेरवाल चौक, जुनी सराफा लाईन, पंचवाटकर गल्ली, अष्टभुजा देवी चौक, आप्पास्वामी मंदिर, आसनगल्ली, शिवाजी चौक मार्गे आंबेडकर चौक, सिव्हिल लाइन, पोस्ट आॅफिस चौक मार्गे तहसील कार्यालय येथे ही हुंकार रॅली धडकली. यावेळी तहसिलदार अजीत शेलार यांना निवेदन देण्यात आले. सीएए या कायद्याविषयीचा गैरसमज दूर व्हावा व या कायद्याविषयी जनजागरण व्हावे या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. रिसोड शहराच्या इतिहासात ‘न भुतो’ अशी ही रॅली निघाली. सकाळी नऊ वाजता सुरु झालेल्या रॅलीचा समारोप तहसिल कार्यालयात पोहचल्यावर व्याख्यानानंतर ११.३० वाजता झाला. या काळात शहरातील संपूर्ण व्यापारपेठ बंद होती. दुपारी १२ वाजतानंतर स्वंयसेवकांच्या विनंतीवरून सर्व व्यापाºयांनी त्यांची प्रतिष्ठाण सुरु केली. या रॅलीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंचचे स्वयंसेवक, व्यापारी महासंघ, माजी सैनिक, डॉक्टर असोसिएशन, महात्मा फुले भाजी मार्केट, विधिज्ञ मंडळ, साईबाबा आॅटोचालक संघटना, शहरातील सर्व व्यायाम शाळा, सर्व सार्वजनिक गणेश मंडळ व दुर्गा मंडळ, शहर व तालुक्यातील विविध संघटना, शेकडोंच्या संख्येने सहभागी झाल्या. या रॅलीत महिला, युवती, युवकांचा मोठया प्रमाणात सहभाग दिसुन आला.