सीएए, एनआरसी समर्थनार्थ वाशिममध्ये ‘हुंकार’; हजारो नागरिकांचा सहभाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 02:53 PM2020-01-12T14:53:57+5:302020-01-12T14:56:38+5:30
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हुंकार रॅलीला सुरूवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरी नोंदणी (एनआरसी)च्या समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने शनिवार, ११ जानेवारी रोजी वाशिम शहरातील मुख्य मार्गावरून ‘हुंकार रॅली’ काढण्यात आली. या रॅलीत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. शेकडो फुट लांबीचा तिरंगा हे या हुंकार रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हुंकार रॅलीला सुरूवात झाली. पाटणी चौक, आंबेडकर चॉक, पोलिस स्टेशनमार्गे रॅलीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या रॅलीत आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, हिंदू जनजागरण मंचचे प्रा. दिलीप जोशी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष आशिष कोठारी, दयानंद सरस्वती महाराज, काकडे महाराज, गोपाल महाराज, सागर महाराज यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रामुख्याने सहभाग नोंदविला. ७०० पेक्षा अधिक महिला व एक हजार मीटर लांबीचा तिरंगा या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. हुंकार रॅलीच्या यशस्वीतेसाठी संतोष लक्रस, गणेश खंडाळकर, सागर चुंबळकर, नवीन शर्मा, कपील सारडा, रामा ठेंगडे, शंकर शेंडे, सुमीत ओझा यांच्यासह सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ७० संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. सीएए या कायद्याविषयीचा गैरसमज दूर व्हावा, या कायद्याविषयी जनजागरण व्हावे, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली.