वाशिम जिल्ह्यात ‘रमाई आवास’ची अंमलबजावणी ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 03:53 PM2018-03-31T15:53:32+5:302018-03-31T15:53:32+5:30
वाशिम : जिल्ह्यात रमाई आवास योजनेंतर्गत ३ हजार घरकुल मंजूर आहेत. मात्र, जोपर्यंत यासंदर्भातील प्रपत्र ‘ड’ प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत पुढची कुठलीच कार्यवाही होणे शक्य नाही.
वाशिम : जिल्ह्यात रमाई आवास योजनेंतर्गत ३ हजार घरकुल मंजूर आहेत. मात्र, जोपर्यंत यासंदर्भातील प्रपत्र ‘ड’ प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत पुढची कुठलीच कार्यवाही होणे शक्य नाही. असे असताना डिसेंबर २०१७ पासून सलग पाठपुरावा करूनही एकाही पंचायत समितीने अद्याप (३१ मार्च) हे अहवाल सादर केलेले नाहीत. दरम्यान, याच विषयावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ४ एप्रिलला गटविकास अधिकाºयांची बैठक बोलाविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत सहाही तालुक्यांसाठी ३ हजार घरकुल मंजूर आहेत. मात्र, पात्र लाभार्थींची संपूर्ण माहिती प्रपत्र ‘ड’मध्ये भरून तसा सविस्तर अहवाल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून मागविण्यात आला आहे. यासंदर्भात नोव्हेंबर २०१७ मध्येच सर्व पंचायत समित्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. डिसेंबर २०१७ अखेर हे अहवाल मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र, मार्च संपूनही पंचायत समित्यांनी ही कार्यवाही पूर्ण केलेली नाही. याबाबत तब्बल ९ ते १० वेळा पंचायत समित्यांना स्मरणपत्र आणि दोनवेळा कारणे दाखवा नोटिस बजावूनही कुठलाच फायदा झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी यापूर्वी भरगच्च बैठकीत गटविकास अधिकाºयांची कानउघाडणी केली होती. आता पुन्हा एकवेळ ४ एप्रिलला रमाई आवास योजनेंतर्गत जिल्हास्तरावर बैठक बोलाविण्यात आली असून त्यात प्रपत्र ‘ड’ पाठविण्याबाबत कुठल्या अडचणी जाणवत आहेत, याबाबत विचारपूस केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.