सराईत गुन्हेगाराविरूद्ध खंडणीचा गुन्हा
By Admin | Published: July 11, 2015 01:38 AM2015-07-11T01:38:59+5:302015-07-11T01:39:06+5:30
एक लाखाची मागणी; आरोपी पसार
वाशिम : अकोला येथून तडीपार असलेला सराईत गुन्हेगार संतोष ठोके याने सिव्हिल लाईन परिसरातील एका वृध्द इसमाला ह्यप्लॉट नावावर करून देह्ण व एक लाख रूपयेसुद्धा दे, अशी मागणी करून धमकी दिली. यावरून वाशिम शहर पोलिसांनी ठोके याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३८५, ३८७ अन्वये गुन्हा दाखल केला. शहरामधील कायदा व सुव्यवस्था अबाधित असताना सराईत गुन्हेगार ठोके याने पुन्हा शहरात अशांतता पसरवून भीतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालु केला आहे. शहरामध्ये प्लॉटच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे घनश्याम सीताराम शर्मा (वय ६५) यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, बस स्थानक परिसरात असलेल्या आनंद भोजनालयाजवळ उभे असताना संतोष ठोके (रा. नालंदा नगर) माझ्याकडे आला. त्याने म्हटले की, प्लॉट माझ्या नावाने करून दे व एक लाख रूपये दे, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. शर्मा यांच्या फिर्यादीहून वाशिम शहर पोलिसांनी ठोके याच्याविरूद्ध अपराध क्रमांक १५८/१५ भादंवि कलम ३८५, ३८७ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन गवळी करीत आहेत. मोटारसायकलची चोरी येथिल पाटणी चौक परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बँक समोरून अज्ञात चोरट्याने मोटरसायकल लंपास केली. ही घटना ९ जुलै रोजी दुपारी १:३0 वाजता घडली. किराणा व्यापारी मो. नदीम मो. अकबर हे स्टेट बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपली मोटारसायकल बँकेसमोर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये ठेवली. त्याच्यावर आधीपासूनच पाळत ठेवत असलेल्या अज्ञात इसमाने मोटारसायकल लंपास केली. स्टेट बँक परिसरात असलेल्या बाकलीवाल ट्रेडर्स या दुकानामधील सीसीटीव्हीमध्ये अज्ञात चोरट्याचे छायाचित्र कैद झाले आहे. याप्रकरणी मो. नदिम यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपिविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.