विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ‘रास्ता रोको’!
By admin | Published: October 4, 2016 02:49 AM2016-10-04T02:49:22+5:302016-10-04T02:49:22+5:30
भारिप-बमसंच्यावतीने कारंजा-वाशिम मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वाशिम, दि. 3- मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा गटग्रामपंचायत अंतर्गत येणार्या पंचशील नगर आणि मूर्तिजापूर या दलितबहुल भागातील समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी भारिप-बमसंच्यावतीने कारंजा-वाशिम मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. मंगरुळपीरमधील मूर्तिजापूर, पंचशीलनगर परिसरात समस्यांचा डोंगर उभा झाला आहे. या ठिकाणी सांडपाण्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था नाही, रस्ते नाही, ठिकठिकाणी घाण साचली आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, याच कारणांमुळे मागील काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीस डेंग्युची लागण झाली होती. या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी समस्या सोडविण्याची मागणी करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकार्यांपयर्ंत निवेदनाद्वारे समस्या पोहोचविल्या; परंतु काहीच फायदा झाला नाही. अखेर ग्राम प्रशासन व अधिकार्यांच्या दुर्लक्षित धोरणाला कंटाळलेल्या आणि विविध समस्यांमुळे नगर यातना भोगणार्या पंचशील नगर आणि मूर्तिजापूर परिसरातील ग्रामस्थांनी व महिलांनी समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी कारंजा-वाशिम मार्गावर रास्ता रोको केला. हे आंदोलन तीव्र झाल्याने मंगरुळपीरचे तहसीलदार, ठाणेदार, मंडळ अधिकारी आणि गटविकास अधिकार्यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच घाणीचा विळखा असलेल्या वस्तीची पाहणी केली. यामध्ये जि.प.शाळा, शिकस्त अंगणवाडी इमारत आणि त्याभोवती असलेला घाणीचा विळखा पाहून अधिकारी संतापले आणी त्वरित या समस्या निकाली काढण्याचे ग्राम प्रशासनाला आदेश दिले. भारिप-बमसंचे मंगरुळपीर तालुका अध्यक्ष शंकर तायडे यांनी या रास्ता रोकोचे नेतृत्व केले.