शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांत संसर्गाचे प्रमाण दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:21 AM2021-02-28T05:21:58+5:302021-02-28T05:21:58+5:30
वाशिम जिल्ह्यातऑक्टोबरच्या मध्यंतरापासून कोरोना संसर्ग नियंत्रित होऊ लागला. नववर्षातील पहिल्याच महिन्यात कोरोना संसर्गाची स्थिती अत्यंत कमी झाली. उपचाराखाली असलेल्या ...
वाशिम जिल्ह्यातऑक्टोबरच्या मध्यंतरापासून कोरोना संसर्ग नियंत्रित होऊ लागला. नववर्षातील पहिल्याच महिन्यात कोरोना संसर्गाची स्थिती अत्यंत कमी झाली. उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या अगदी ३० पर्यंत पोहोचली होती; परंतु फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यापासून कोरोना संसर्गात वाढ होऊ लागली आणि गत आठवड्यात तर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेकच झाला. प्रामुख्याने शहराच्या तुलनेत ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे रुग्ण अधिक वाढू लागले. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींची चाचणी झपाट्याने करण्याची कसरत आरोग्य विभागाला करावी लागत आहे. जिल्ह्यात २१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान आढळलेल्या ९७३ कोरोनाबाधितांपैकी ६३१ रुग्ण हे ग्रामीण भागातीलच आहेत. त्यात देगाव येथील निवासी शाळेत आढळलेल्या १९० जणांचा समावेश आहे.
---------
जिल्ह्यांच्या सिमेवरील गावची स्थिती गंभीर
लगतच्या अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात या आठवड्यापूर्वीच कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. वाशिम जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या गावातील लोकांचे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आवागमन होत असतानाच त्या जिल्ह्यातील नागरिकांचाही वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रवास सुरू असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या गावांत कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. त्यात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या धनज आणि कामरगाव परिसरातील गावांचा समावेश आहे.
------------
चेकपोस्टवरील तपासणीही कुचकामी
अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील नागरिक कारंजामार्गे मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यात दाखल होत आहेत. यातून कोरोना संसर्गास वाव मिळू नये म्हणून जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार कारंजा तहसीलदारांनी वाशिम जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या दोनद बु., ढंगारखेड, मेहा, सोमठाणा आणि खेर्डा येथे चेकपोस्ट सुरू करून आरोग्य कर्मचाºयांसह पोलिसांची नियुक्ती केली. तेथे परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांची तपासणी करूनच वाशिम जिल्ह्यात प्रवेश दिला जात असला तरी, जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.
----------
आठवड्यातील तुलनात्मक रुग्णसंख्या
शहरी भागात ३४२, तर ग्रामीण भागात ६३१
-------
असे आहे आठवड्याचे प्रमाण
२१ फेब्रुवारी १२५
शहरी ४७
ग्रामीण ७८
-----------
२२ फेब्रुवारी ६२
शहरी ३२
ग्रामीण ३०
-----------
२३ फेब्रुवारी ८७
शहरी ३३
ग्रामीण ५४
-----------
२४ फेब्रुवारी ३१८
शहरी ७९
ग्रामीण २३९
-----------
२५ फेब्रुवारी २३५
शहरी ८०
ग्रामीण १५५
------
२६ फेब्रुवारी १४६
शहरी ७१,
ग्रामीण ७५
------------