पेट्रोलचा पुन्हा भडका; वाशिमात १०८ रुपये प्रती लिटरचा दर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 06:20 PM2021-09-30T18:20:48+5:302021-09-30T18:20:57+5:30
Petrol price hike : २८ सप्टेंबर रोजी डिझेलचे दर २५ ते ३० पैसे तर पेट्रोलच्या प्रती लिटर दरात २२ ते २४ पैशाने वाढ करण्यात आली.
- संतोष वानखडे
वाशिम : इंधन दरवाढीच्या भडक्यात सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा होरपळून निघणार असून, वाशिम जिल्ह्यात प्रती लिटर १०८ रुपयावर दर पोहचले आहेत. तब्बल २३ दिवस दर स्थिर ठेवल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी डिझेलचे दर २५ ते ३० पैसे तर पेट्रोलच्या प्रती लिटर दरात २२ ते २४ पैशाने वाढ करण्यात आली.
जीवनावश्यक वस्तू, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडून जात आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने साहजिकच वाहतुकीचा खर्च वाढतो. डिझेलच्या दरातील वाढीमुळे शेती मशागतीचा खर्चही वाढला आहे. मार्च २०२१ पासून सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याने प्रवास करावा तरी कसा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. पेट्रोलच्या दरात १ आणि ६ सप्टेंबरला १५ पैशांची कपात केली होती. त्यानंतर २३ दिवस दर स्थिर होते. आता २० ते २२ पैशांनी पेट्रोल महागले आहे. १ मार्च रोजी जिल्ह्यात पेट्रोलचे दर प्रती लिटर ९८.०४ तर डिझेलचे ८७.७३ रुपये असे होते. २९ सप्टेंबर रोजी पेट्रोल १०८.२४ तर डिझेल ९६.५८ रुपयावर झेपावले. इंधन दरवाढीनंतर जनतेला महागाईच्या संकटाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईत पेट्रोल १०७.४७; वाशिमात १०८.२४ रुपये
पेट्रोल, डिझेलच्या डेपोपासून पंपाचे किती अंतर आहे, यावर दर अवलंबून असतात. अंतर जेवढे जास्त, तेवढा वाहतुकीचा खर्च वाढतो. वाशिम जिल्ह्यात गायगाव (जि.अकोला) येथील डेपोवरून पेट्रोल व डिझेल येते. मुंबईत पेट्रोलचे दर १०७.४७ तर वाशिमात १०८.२४ रुपयावर गेले आहेत.