नवीन आदेशाने वाढणार ‘रेशन’;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:23+5:302021-09-21T04:47:23+5:30
तालुकानिहाय अहवाल मागविला : लवकरच होणार कार्यवाही वाशिम : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीवर असलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. ...
तालुकानिहाय अहवाल मागविला : लवकरच होणार कार्यवाही
वाशिम : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीवर असलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी प्राप्त प्रस्ताव निकाली निघणार असून, जवळपास १५ दुकानांची आणखी भर पडणार आहे.
नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या आता वाढणार आहे. वाशिम जिल्ह्यातही जवळपास १५ दुकाने वाढू शकणार आहेत. जिल्ह्यात एकूण ७७६ रेशन दुकान असून, या माध्यमातून लाभार्थींना रेशन धान्याचे वितरण करण्यात येत आहे. मयत, दुकान परवाना निलंबन यासह अन्य कारणांमुळे रेशन दुकानाचा परवाना रद्द झाला तर तेथे नव्याने परवाना देण्यात येतो. यासाठी अर्ज मागविणे, जाहीरनामा काढणे यासह अन्य प्रशासकीय सोपस्कार पार पाडावे लागतात.
००००
तालुकानिहाय माहिती मागविणार
शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीवरील स्थगिती हटविण्यात आली आहे. त्यामुळे तालुकानिहाय नेमके किती प्रस्ताव प्रलंबित आहेत, किती ठिकाणी नवीन रेशन दुकान परवाना देता येईल, या अनुषंगाने तालुकानिहाय माहिती मागविण्यात आली आहे. जवळपास १५ दुकाने वाढू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत असला तरी प्रत्यक्षात तालुकानिहाय माहिती प्राप्त झाल्यानंतर निश्चित आकडा समोर येणार आहे. येत्या आठवड्यात तालुकानिहाय माहिती पुरवठा विभागाला प्राप्त होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर जाहीरनामा काढणे व अन्य प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
...........................
काय आहेत अडचणी?
लाभार्थींना जवळच्या रेशन दुकानातून रेशन धान्य पुरविण्यात येते. काही कारणास्तव त्या दुकानाचा परवाना रद्द झाला तर नजीकच्या दुकानातून रेशन धान्य दिले जाते. त्यामुळे लाभार्थींना विनाकारण मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. आता प्रस्तावित रेशन दुकानांना परवानगी मिळणार असल्याने लाभार्थींची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.......
एकूण रेशन दुकाने ७७६
शहरी ८४
ग्रामीण ६९२
००००००
कोट
शासन निर्णयानुसार जिल्ह्यात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीसंदर्भात कार्यवाही केली जाणार आहे. याबाबत तालुकानिहाय माहिती मागविण्यात आली असून, त्यानंतर प्रत्यक्ष पुढील कार्यवाही केली जाईल.
- संदीप महाजन
प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम