मका, ज्वारीच्या वितरणात अडकले लाभार्थ्यांचे रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 01:06 PM2021-02-17T13:06:29+5:302021-02-17T13:06:56+5:30

Washim News अर्धा महिना उलटला तरी पूर्वीचे रेशनही शिधापत्रिकाधारकांना मिळू शकले नाही.

Ration of beneficiaries stuck in maize, sorghum distribution | मका, ज्वारीच्या वितरणात अडकले लाभार्थ्यांचे रेशन

मका, ज्वारीच्या वितरणात अडकले लाभार्थ्यांचे रेशन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शासनाने रास्त दर धान्य दुकानांमधून मका व ज्वारीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला; परंतु नियमानुसार वितरणासाठी या धान्याचा पॉस मशीनवर समावेशच केला नाही. त्यामुळे या धान्याचे वितरण करणे दुकानदारांना अशक्य आहे. त्यातच अनेक दुकानांमध्ये अद्याप मका, ज्वारीच पोहोचलेली नाही. त्यामुळे अर्धा महिना उलटला तरी पूर्वीचे रेशनही शिधापत्रिकाधारकांना मिळू शकले नाही.  
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनमधील स्वस्त धान्याचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात २ लाख ७८ हजार १५० शिधापत्रिका असून, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना गहू व तांदळाचा लाभ दिला जातो. त्यात जानेवारी महिन्यापर्यंत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी २ रुपये प्रतिकिलो दराने ३ किलो गहू व ३ रुपये प्रतिकिलो दराने २ किलो तांदूळ, तसेच अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड २ रुपये किलोप्रमाणे १५ किलो गहू व ३ रुपये किलोप्रमाणे २० किलो तांदूळ वितरीत केला जातो. आता मात्र शासनाने प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय योजनेच्या २.३० लाख शिधापत्रिकाधारकांना रेशनवर मका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  पूर्वीच्या रेशन धान्यातील गव्हाच्या वितरणाचे प्रमाण ५० टक्के कमी करून ४० टक्के मका व १० टक्के ज्वारी असे प्रमाण ठरविण्यात आले आहे. दोन्ही धान्याचे प्रति १ रूपया किलोप्रमाणे फेब्रुवारी महिन्यापासूनच वितरण केले जाणार होते. त्यासाठी रास्त दर धान्य दुकानांमध्ये मका आणि ज्वारीचा पुरवठाही करण्यात आला. तथापि, पॉस मशीनवर या धान्याची नोंदच करण्यात आली नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांना धान्याचे वितरण करता येत नाही. 


काही दुकानांत मका, ज्वारी पोहोचलीच नाही
जिल्ह्यातील काही रास्त दर धान्य दुकानांमध्ये शासन निर्णयानुसार वितरण करण्यासाठी मका आणि ज्वारीचा पुरवठा करण्याबरोबरच गव्हाचा पुरवठाही पूर्वीच्याच प्रमाणानुसार करण्यात आल्याने त्यांच्यापुढे साठवणुकीची अडचण निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे काही रास्त दर धान्य दुकानांमध्ये अर्धा महिना उलटला तरी मका, ज्वारीच पोहोचलेली नाही. 


शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच पॉस मशीनवर मका, ज्वारीची नोंद होऊ शकली नाही. आता ती करण्यात आली असून, वितरणही सुरू झाले आहे. इतर रास्त दर धान्य दुकानदारांनी पडताळणी करून मका, ज्वारीचे ठरलेल्या प्रमाणानुसार वितरण करावे तसेच मागील महिन्याच्या प्रमाणानुसार काही ठिकाणी गव्हाचा पुरवठा झाला नव्हता. तो या महिन्याच्या सुरुवातीला झाल्याने पूर्वीच्या प्रमाणाएवढाच आहे. पुढे निर्धारित प्रमाणानुसार त्यात कपात होणार आहे.
-सुनील विंचनकर, जिल्हा पुरवठा अधिकारी


शासन निर्णयानुसार मका, ज्वारीचे वितरण रास्त दर धान्य दुकानांतून केले जाणार आहे. यासाठी पुरवठा विभागाकडून काही ठिकाणी मका, ज्वारीचा पुरवठाही करण्यात आला. काही ठिकाणी मात्र तो अद्याप झालेला नाही. तसेच काही दुकानांमध्ये साठवणुकीचीही अडचण आहे. प्रशासनाने याची पडताळणी करून ती दूर करावी. पॉस मशीनच्या आधारेच या धान्याचे वितरण करता येणार आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांच्या या संदर्भातील अडचणीही दूर कराव्यात.
-प्रभाकर काळे, जिल्हाध्यक्ष स्वस्तधान्य दुकानदार संघटना

Web Title: Ration of beneficiaries stuck in maize, sorghum distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम