शिधापत्रिकाधारकांना तीन वर्षांपासून वाटपच नाही
By admin | Published: December 30, 2014 12:39 AM2014-12-30T00:39:21+5:302014-12-30T00:39:21+5:30
पुरवठा विभाग अनभिज्ञ: स्वस्तधान्य दुकानदारांची मनमानी.
मानोरा (वाशिम): तालुक्यातील फुलउमरी येथे काही लाभार्थींना जून २0११ मध्ये शिधापत्रिका देण्यात आल्या; परंतु साडेतीन वर्षांचा कालावधी उलटला तरी संबंधित स्वस्तधान्य दुकानदाराने या लाभार्थींना त्यांच्या हक्काचे शिधावाटप एकदाही केलेले नाही.
गोरगरिबांना पोटभर अन्न खायला मिळावे म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. दारिद्रय़ रेषेखालील लोकांसाठी अन्न सुरक्षा योजनाही शासनाकडून अमलात आणण्यात आली आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनातील संबंधित अधिकार्यांना देण्यातही आले आहेत; परंतु त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणीच होत नसल्यामुळे गोरगरीब जनता त्यांच्या हक्कापासून वंचित होत आहे. याचे जिवंत उदाहरण मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे पाहायला मिळते. या छोट्याशा गावातील काही ग्रामस्थांना २0१३ च्या जून महिन्यात पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका देण्यात आल्या होत्या. जयसिंग रुपसिंग चव्हाण यांच्याकडे फुलउमरीचे शिधावाटप आहे, अर्थात या गावचे स्वस्तधान्य दुकानदार ते आहेत. त्यामुळे या दुकानातून सदर शिधापत्रिंकाधारकांना त्यांच्या हक्काचे शिधावाटप नियमितपणे व्हायला हवे; परंतु तसे होत नाही. या ठिकाणच्या काही लाभार्थींना गत साडेतीन वर्षात एकदाही त्यांच्याकडून शिधावाटपच झाले नसल्याची तक्रार शिधापत्रिंकाधारकांनीच केली आहे. काही शिधापत्रिकांना वाटप करण्यात येते; परंतु तेसुद्धा नियमाप्रमाणे करण्यात येत नसल्याचीही तक्रार त्यांच्याकडून करण्यात येत आहे. दर महिन्याला शासनाकडून मिळणार्या धान्याचे वाटप करण्यासाठी येथील स्वस्तधान्य दुकानदाराला त्याच्या क्षेत्रातील शिधापत्रिकांनुसार पुरवठा करण्यात येतो. त्यानंतर लाभार्थी हक्काचे शिधावाटप घेण्यासाठी त्याच्याकडे जातात; परंतु तो उडवाउडवीची उत्तरे देऊन या लाभार्थींची बोळवण करतो. संबंधित विभागाकडून तुमच्या वाट्याचा मालच मिळाला नाही, अशी उत्तरे तो देतो. त्याच्या मनमानी कारभाराला लाभार्थी कंटाळून गेले असून, या स्वस्तधान्य दुकानदाराचा परवानाच रद्द होण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे.