रेशन दुकानांची होणार चौकशी
By admin | Published: August 14, 2016 03:37 PM2016-08-14T15:37:35+5:302016-08-14T16:47:41+5:30
वाशिम जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानांतून दरपत्रक व माहितीदर्शक फलक गायब झाल्याचे ‘स्टिंग’ लोकमतने प्रकाशित करताच पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली.
Next
संतोष वानखडे
वाशिम - जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानांतून दरपत्रक व माहितीदर्शक फलक गायब झाल्याचे ‘स्टिंग’ लोकमतने प्रकाशित करताच पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली. स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकार्याने दिले. फलक नसणाºया दुकानांचा अहवाल मागविला असून, दोषी आढळणाºयांवर कडक कारवाईचे संकेत पुरवठा विभागाने दिले.
सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. गोरगरीबांना वितरित होणाºया रेशन धान्याचा पुरवठा पात्र लाभार्थींपर्यंत योग्य किंमतीत व योग्य प्रमाणात व्हावा म्हणून रेशन दुकानात भावफलक, उपलब्ध साठा, तक्रार वहि ठेवणे बंधनकारक आहे. वाशिम जिल्ह्यात काही दुकानांमध्ये या नियमाला मूठमाती दिली जात असल्याचे प्रकार सुरू आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ चमूने ११ आॅगस्ट रोजी ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानात स्टिंग आॅपरेशन राबविले. मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरातील काही दुकाने बंद आढळून आली तर काही दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे दरपत्रक आढळून आले नाही. एक दुकान तर पडक्या घरात थाटल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील रिसोड, वाशिम, कारंजा, मानोरा व मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागातही काही दुकानांच्या दर्शनी भागात दरपत्रक, तक्रार पेटी आढळून आली नव्हती तसेच पावती दिली जात नसल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. यासंदर्भात १२ आॅगस्टच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित होताच, पुरवठा विभाग आणि नियमांची पायमल्ली करणाºया स्वस्त धान्य दुकानदारांत एकच खळबळ उडाली. या स्टिंग आॅपरेशनची दखल घेत जिल्हा पुरवठा विभागाने दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश पुरवठा निरीक्षकांना दिले.
रेशन दुकानांच्या दर्शनी भागात दरपत्रक व माहितीदर्शक फलक न लावणे ही गंभीर बाब असून, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे यांनी दिला. फलक न लावणाºया दुकानांचा अहवाल मागविला जाणार असून, चौकशीअंती दोषी आढळणाºयांना कारवाई करण्याचे संकेत पुरवठा विभागाने दिले.