‘कन्टेनमेंट झोन’ची पुन्हा अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:01 AM2021-02-23T05:01:56+5:302021-02-23T05:01:56+5:30
जिल्ह्यात या आठवड्याच्या सुरुवातीपासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्बंध लावण्याचे आदेश पारित करावे लागले. जिल्ह्यात २१ ...
जिल्ह्यात या आठवड्याच्या सुरुवातीपासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्बंध लावण्याचे आदेश पारित करावे लागले. जिल्ह्यात २१ फेब्रुवारीपर्यंत ७७७३ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ७११४ रुग्ण बरे झाले, तर १५६ जणांचा मृत्यू झाला असून, ५०२ जणांवर उपचार सुरू करण्यात आले. कोरोना संसर्गाचा हा वेग कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे सुधारित आदेश २२ फेब्रुवारीपासून लागू केले असून, ज्या ठिकाणी कोरोना संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. अशा परिसरात युद्धपातळीवर कोरोना चाचणी करतानाच बाधित रुग्णांचा परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर करण्याची प्रक्रियाही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येकच तालुक्यात ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
-----------
कन्टेनमेंट झोनची कक्षा मर्यादित
लॉकडाऊनच्या काळात कोरोनबाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसरात १०० मीटर अंतरापर्यंत कन्टेनमेंट झोनची अंमलबजावणी करण्यात येत होती. आता मात्र ही कक्षा मर्यादित करण्यात आली असून बाधित रुग्णाच्या घराला लागूनच असलेल्या सभोवतालच्या पाच ते सात घरांचा समूह किंवा लहान गल्ली कन्टेनमेंट झोनमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
-------------------
फिजिकल डिस्टन्सिंगसाठी व्यावसायिकांना कठोर निर्देश
कोरोना संसर्ग नियंत्रणात व्यावसायिकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते. यासाठी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन प्रत्येक व्यावसायिकाने करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून प्रत्येक व्यावसायिकाला ग्राहकांत अंतर राखण्यासाठी वर्तुळे आखण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. या सूचनेचे उल्लंघन करून दुकानांतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांवरही प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे.
------------