सोयाबीन, तुरीच्या बियाण्यांकडे शेतकºयांची पाठ
By admin | Published: June 12, 2017 01:39 PM2017-06-12T13:39:31+5:302017-06-12T13:39:31+5:30
शेतकºयांनी सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांकडे पाठ फिरविली असून, या दोन्ही वाणांसाठी घरचे बियाणे वापरण्यावर अधिक भर असल्याचे दिसत आहे.
घरच्या बियाण्यांवर भर: मुग, उडिदाची मागणी वाढली
वाशिम: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांकडे पाठ फिरविली असून, या दोन्ही वाणांसाठी घरचे बियाणे वापरण्यावर अधिक भर असल्याचे दिसत आहे. मुग आणि उडिदाच्या बियाण्यांची मागणी वाढल्याची माहिती कृषी सेवा केंद्रांकडून प्राप्त होत आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र २ लाख ८७ हजार ४३० हेक्टर, तुरीचे ६३ हजार ५०१ हेक्टर, मुगाचे १२ हजार ६०० हेक्टर, तर उडिदाचे १५ हजार २१७ हेक्टर होते. यंदाही तूर आणि सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होणार असला तरी, त्याचे क्षेत्र घटणार असल्याचे बाजारातील स्थिती आणि कृषी विभागाच्या प्रस्तावित अहवालावरून स्पष्ट होते. मागील वर्षी सोयाबीन आणि तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले; परंतु या दोन्ही वाणांना अपेक्षेपेक्षा खूप कमी भाव मिळाल्याने हजारो शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंतही या वाणांची विक्री केली नाही. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र कमी करून इतर पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. त्यातच घरीच मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि तूर पडून असल्याने या वाणाचे बियाणे विकत घेण्यापेक्षा घरचे बियाणे वापरण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे. कृषी सेवांकेंद्रांकडून घेतलेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या तुलनेत सोयाबीन आणि तुरीच्या बियाण्यांची मागणी ५० टक्क्यांनी घटल्याचे सद्यस्थितीत स्पष्ट होत आहे. दरम्यान मागील वर्षीपेक्षा यंदा बियाण्यांचे दर कमी झाल्याचे या संदर्भातील माहितीवरून स्पष्ट होत आहे.