मालेगाव येथील वाचन विकास प्रशिक्षणला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:08 PM2017-12-23T16:08:55+5:302017-12-23T16:13:06+5:30
मालेगाव :- येथील अकोला मार्गावरील आयएमए हॉल येथे पार पडलेल्या वाचन विकास प्रशिक्षणात जिल्हाभरातील शेकडो शिक्षकांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांमधील वाचन विकसीत करण्याबाबतचे मार्गदर्शन घेतले.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण विकास प्रशिक्षण तसेच व शिक्षा अभियान पंचायत समिती मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. शिक्षणामध्ये आनंददायी वाचन शिक्षण पूरक कृती आणि विद्यार्थ्याच्या वाचनातील मागोवा घेऊन उत्कृष्ट श्रवण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. भावविश्वातील अनुभव विद्यार्थ्यांना दिले, तर त्यांचे श्रवण वाचन मनन चिंतन अतिशय योग्य प्रकारे होते. पर्यायाने भाषण संभाषणही चांगल्या प्रकारे होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात वाचनाचे टप्पे शिकवताना कृतियुक्त अध्यापन करुन मार्गदर्शन करण्यात आले. चित्र वाचन, चित्र गाडी मॅचिंग टेस्ट, शब्द चक्र, अक्षर गट, वचन पाठ आदि अनुभव देण्यात आले. कृतियुक्त गाणी, बड़बड़ गीते, चित्र शब्द वाचन आदिंबाबतही आनंदायी मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण राज्यात आतापर्यंत अनेक शाळा प्रगत झाल्या आहेत; परंतु मुलांची वाचन क्षमता शंभर टक्के विकसित झाली नाही. ही क्षमता विकसित करण्यासाठी तसेच वाचन विकास टप्पे आणि त्यामागील विचार समजून घेऊन वाचनाचे क्षमता वाढण्यासाठी या राज्यव्यापी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात वाचन क्षमता चे टप्पे त्यामागील शिक्षकाची मार्गदर्शकचि भूमिका याबाबत संकल्पना स्पष्ट केल्या गेली. प्रशिक्षणाला जेष्ठ अधिव्याख्याता अरुन सांगोलकर, अमोल डोंगाळे, राजेश गवई क्रांति कुलकर्णी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले, तसेच तज्ञ मार्गदर्शक म्हणून विषयतज्ञ भास्कर कोहळे, मनोहर बाहे, संदीप दसपुते, बालाजी पाचपुते आदिंनीही मार्गदर्शन केले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. वाय. पाटील, राज्य समन्वयक नरेश नाखले, किशोर वैष्णव, तसेच प्रमुख नियंत्रक गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनीसुद्धा या प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट देऊन मार्गदर्शन केले.