रुग्णांच्या सेवेसाठी खासगी डॉक्टर कटिबद्ध-अनिल कावरखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 07:11 PM2020-03-28T19:11:50+5:302020-03-28T19:12:19+5:30
खासगी डॉक्टरांची भूमिका यासंदर्भात आयएमएचे वाशिम जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्याशी साधलेला हा संवाद...
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येक जण सावधगिरी म्हणून दक्षता घेत आहे. मध्यंतरी खासगी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण सेवा बंद केल्याने पेच निर्माण झाला होता. शेवटी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए), निमा संघटनेच्या चर्चेतून खासगी डॉक्टरांनी २७ मार्चपासून रुग्णसेवा सुरू केली. कोरोना विषाणू संसर्ग, घ्यावयाची दक्षता, खासगी डॉक्टरांची भूमिका यासंदर्भात आयएमएचे वाशिम जिल्हा अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्याशी साधलेला हा संवाद...
प्रश्न - कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?
उत्तर - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेणे हा एकमेव उपाय आहे. सरकारने ज्या काही उपाययोजना सांगितले, निर्णय घेतले त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे अन्यथा संपूर्ण मानवजातीला संसर्ग होण्यास फारसा वेळ लागणार नाही. इटली, अमेरिका यासारख्या प्रगत देशांनी कोरोना विषाणूसमोर हात टेकले आहेत. त्यामुळे आपण कोरोना विषाणू संसर्गाला गांभीर्याने घेऊन ‘लॉक डाऊन’च्या काळात घरातच राहणे आवश्यक आहे.
प्रश्न - मध्यंतरी खासगी डॉक्टरांनी बाह्यरुग्ण तपासणी बंद केली होती, यासंदर्भात काय सांगाल?
उत्तर -कोरोना विषाणूसंदर्भातील रुग्णांवर उपचार करताना काही डॉक्टरांना जीव गमवावा लागला. संरक्षण किट द्यावी, अशी डॉक्टरांची मागणी होती. यासंदर्भातील जिल्हाधिकाºयांनी डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाºयांशी सकारात्मक चर्चा केली. रुग्णसेवा लक्षात घेता २७ मार्चपासून खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू केले आहेत. रुग्णांनीदेखील मास्क लावून, अन्य दक्षता घेऊन व आवश्यकता असेल तरच सोबत एका नातेवाईकाला घेऊन रुग्णालयात यावे.
प्रश्न - कोरोनासंदर्भात कोणती दक्षता घ्यावी?
उत्तर -मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यानंतर विशिष्ट अंतर राखून उभे राहणे, घराबाहेर न पडणे आदी दक्षता घेणे आवश्यक आहे.
प्रश्न - संरक्षक किटचा प्रश्न कसा हाताळणार
उत्तर - रुग्णसेवा देताना डॉक्टरांना संरक्षक किट आवश्यक आहे. सध्या मार्केटमध्ये संरक्षक किट उपलब्ध नाही. मार्केटमध्ये संरक्षक किट उपलब्ध झाली तर इंडीयन मेडीकल असोसिएशनच्यावतीने संरक्षक किट खरेदी करण्याचा मानस आहे. ही संरक्षक किट खासगी डॉक्टरांना उपलब्ध करून देण्यात आली. यासोबत संरक्षक किटबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चाही केली आहे. ही चर्चा सकारात्मक असून, यावर विचार केला जात आहे. शेवटी रूग्णांची सेवा करण्याºया डॉक्टरांची सुरक्षितताही महत्वाचीच आहे.